काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मशिदींवरील भोंग्यांना होणाऱ्या विरोधावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी आपण स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचून घराबाहेर पडत असल्याचं सांगितलं. यावर त्यांना विरोधकांचा काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींनी हनुमान चालिसा वाचायला परवानगी दिली का या प्रश्नाबाबत विचारलं. यावर नाना पटलो यांनी थेट उत्तर दिलं. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

काँग्रेस नेत्यांना हनुमान चालिसा वाचायला सोनिया गांधींनी परवानगी दिली का? असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले, “आम्ही सर्वधर्मसमभावाच्या विचाराला मान्य करतो. आमचं संविधान आम्हाला तेच सांगतंय. आमचा धर्म देखील आम्हाला कोणावर टीका करायला शिकवत नाही. यांचा धर्म वेगळा आहे. दुसऱ्यांच्या धर्मावर टीका करणारी ही लोक आहेत. हे संविधानाला मानणारी लोक नाहीत. त्यामुळे सोनिया गांधी आम्हाला काहीही सांगत नाहीत.”

“मी जाहीरपणे सांगतो की मी रोज सकाळी…”

“मी जाहीरपणे सांगतो की मी रोज सकाळी हनुमान चालिसा वाचूनच घराबाहेर येतो. त्यामुळे आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. प्रत्येकाने आपआपल्या धर्मावर प्रेम करायचा संदेश सोनिया गांधी यांनी आम्हाला दिलाय,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “मी स्वतः हिंदू, दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण…”, नाना पटोले यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

“सरकारने धर्मगुरुंना बोलवावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी”

“सरकारने धर्मगुरुंना बोलवावं आणि त्यांच्याशी चर्चा करून त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. धर्मगुरू या सर्वगोष्टी मान्य करतील. त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. पण हे धर्माचे ठेकेदार ज्या पद्धतीने वागत आहेत, राज्याला बदनाम करत आहेत ही परंपरा थांबवली पाहिजे. शासनाने शासन केलं पाहिजे,” अशी मागणी पटोले यांनी सरकारकडे केली.