मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यात आणि कृतीत मोठे अंतर असल्याचा आरोप करत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकार जातनिहाय जनगणनेचा केवळ देखावा करून ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहे. तसेच, ओबीसींना खुल्या प्रवर्गात ढकलण्याचा हा सुप्त डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
पटोले यांनी शुक्रवारी शिष्टमंडळासह राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी ओबीसींना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला. बिहार आणि तेलंगणा राज्य सरकारने ज्या पद्धतीने जातनिहाय जनगणना केली, त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही करावी. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, असे पटोले म्हणाले.
राज्यात दुष्काळ जाहीर करा
राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडासह अनेक भागात कोरडा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. शेतकरी चिंतेत असून शेतातील पिके करपून गेली आहेत. कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने दुष्काळ जाहीर करुन मदत दिली त्याच पद्धतीने फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर यांना भरीव मदत द्यावी. तसेच जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही पटोले यांना यावेळी केली.
ओबीसींची जातनिहाय आकडेवारी आवश्यक
ओबीसी समाज हा राज्यातील एक महत्त्वाचा सामाजिक घटक आहे. मात्र ओबीसी समाजाची एकत्रित आणि जातनिहाय लोकसंख्या, त्यांची सामाजिक-शैक्षणिक स्थिती, आर्थिक परिस्थिती तसेच विविध क्षेत्रांमधील त्यांचे प्रतिनिधित्व याबाबत सर्वसमावेशक तसेच अद्ययावत अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे या समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेली धोरणात्मक आखणी प्रभावीपणे करता येत नाही. त्यासाठी ओबीसी समाजाची जातनिहाय अधिकृत आकडेवारी आवश्यक आहे, असे पटोले यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
