नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्रात वैचारिक मतभेद असतात. मात्र, मैत्रीपूर्ण नाती तशीच राहतात. त्यामुळे धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले म्हणून चुकीचा अर्थ लावण्याचं कारण नाही,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रात राजकीय मतभेदाचा विषय नसतो. निवडणुका येतात, सभागृहात एकत्र येतो तेव्हा वैचारिक मतभेद असतात. मात्र, मैत्रीपूर्ण नाती तशीच राहतात. फडणवीस आमच्याकडे येतील, आम्ही त्यांच्याकडे जाऊ. तो काही भाग नाही. महाराष्ट्रात याचप्रकारचं राजकारण आहे. राज्याने जोपासलेली राजकीय संस्कृती जपली पाहिजे. त्यामुळे धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले म्हणून चुकीचा अर्थ लावण्याचं कारण नाही.”

“विधान परिषदेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी आमची भूमिका”

“आमच्या महाविकासआघाडीच्या सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू आहेत. त्या चर्चा पूर्ण झाल्यानंतरच उमेदवार द्यायचा की नाही हे ठरेल. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे विधानसभेत त्यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद जाईल. मात्र, विधान परिषदेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी आमची भूमिका आहे. तो प्रस्ताव आम्ही आमच्या दोन्ही मित्रपक्षांना पाठवला आहे,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

“कुणालाही कुणाच्या धर्मावर टीका करण्याचा अधिकार नाही”

नाना पटोले यांनी भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांवरही मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “आज कोर्टाने नुपूर शर्मांविरोधात निरिक्षण नोंदवलं. त्याचं आम्ही स्वागत करतो. आपला देश संविधानानुसार चालतो. संविधानानुसार कुणालाही कुणाच्या धर्मावर टीका करण्याचा अधिकार नाही. मात्र, काही पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्मचाा वापर करत आहेत. त्यामुळे देश तुटत आहे. नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेलं विधान निषेधार्ह होतं.”

हेही वाचा : “कोणाचे हितसंबंध जोपासण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ?”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

“मुस्लीम धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माबद्दल काही चुकीचं वक्तव्य केलं तर…”

“मुस्लीम धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माबद्दल काही चुकीचं वक्तव्य केलं तर त्याचाही विरोध केला पाहिजे. त्यावरही कारवाई झाली पाहिजे. मात्र, या देशात कुणालाही कुणाच्या धर्मावर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निकालाचं आम्ही स्वागत करतो,” असं पटोले यांनी नमूद केलं.