बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "त्यांचा आणखी राजकीय..." | Nana Patole comment on speculations of resignation by Balasaheb Thorat | Loksatta

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Nana Patole Balasaheb Thorat
नाना पटोले व बाळासाहेब थोरात (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. “असं काहीही झालेलं नाही”, असं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलं. तसेच थोरातांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा मी सदिच्छा देतो. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचा, तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही.”

हेही वाचा : “आपण बाळासाहेबांच्या काँग्रेसचे काम करायचे, की नानांच्या काँग्रेसचे?”, पक्ष प्रवक्त्याचं ट्वीट चर्चेत

“कार्यकारणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते. असं असताना काही लोक तर वर्ष वर्ष घेत नव्हते. मात्र, आमची मागील महिन्यातच नागपूरमध्ये प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली होती. आता पुन्हा १५ फेब्रुवारीला अशीच एक बैठक होणार आहे. त्यात या पोटनिवडणुकींची रणनीती बनवणं, आत्ताच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात विजयी आमदारांचा सत्कार आणि राहुल गांधींबरोबर कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असं चाललेले यात्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

“आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही”

“१५ फेब्रुवारीच्या कार्यकारणी बैठकीत पक्षातील घडामोडींवरही चर्चा केली जाईल. आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही. माध्यमं काँग्रेसबाबत फार चिंता करत आहेत,” असंही नाना पटोलेंनी म्हटलं.

“पुण्यात आमचे दोन नेते व्यक्तिगत कामामुळे येऊ शकले नाही”

नाना पटोले पुढे म्हणाले, “६ फेब्रुवारीला काँग्रेस आणि भाजपा दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरला. त्यावेळी आमचे दोन नेते व्यक्तिगत कामामुळे येऊ शकले नाही, तर त्याच्या बातम्या झाल्या. मात्र, भाजपाची साधी चर्चाही होत नाही. तिथं भाजपाची काय अवस्था आहे हे निकालात पाहायला मिळेल.”

हेही वाचा : “तुम्ही बाळासाहेब थोरातांना फोन करणार का?”, नाना पटोले म्हणाले, “आमचं त्यांच्याबरोबर…”

“बाळासाहेब थोरात आमच्याशी अजून बोलतच नाहीत”

“बाळासाहेब थोरात आमच्याशी अजून बोलतच नाहीत. माध्यमांशी बोलत असतील तर माध्यमांनी त्यांना राजीनामा दिला का हे विचारावं. त्यांची तब्येत चांगली नाही. माझा त्यांच्याशी संपर्क नाही. काल पुण्यात उमेदवारांचे अर्ज भरताना सर्वच नेते आले होते. त्यात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेस होता. त्यावेळी बाळासाहेब थोरातांनीही यावं अशी आमची अपेक्षा होती,” असंही नाना पटोलेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 11:18 IST
Next Story
मुंबई : तळीयेतील बाधित कुटुंबांसाठीच्या ६६ घरांचे काम मार्चमध्ये पूर्ण, २०० घरांच्या प्रकल्पाला अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाकडून वेग