“नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची मागील ८ वर्षांतील कामगिरी सर्वच आघाडीवर शून्य राहिली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. जनतेसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली. अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे, तर मागील ८ वर्ष ही खासगीकरणातून मोदींचे उद्योगपती मित्र मात्र मालामाल आणि जनतेचे प्रचंड हाल करणारी ठरली आहेत,” असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना नाना पटोले म्हणाले, “नरेंद्र मोदी सरकारचा पायाच खोटेपणावर उभारलेला आहे. २०१४ साली वारेमाप आश्वासने देत सत्तेवर आले, पण आतापर्यंत एकही आश्वासन हे सरकार पूर्ण करु शकले नाही. महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात महागाई दुपटीने वाढली. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ४५० रुपये होता तो आज एक हजारांपेक्षा जास्त महाग झाला आहे.”

“पेट्रोल ६५ रुपये लिटर होते ते आज ११० रुपये लिटर झाले”

“पेट्रोल ६५ रुपये लिटर होते ते आज ११० रुपये लिटर झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही दुप्पट झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे स्वप्न सुद्धा स्वप्नच राहिले. सरकारी पदे रिक्त असूनही भरली जात नाहीत, रेल्वेतील ७२ हजार पदे संपुष्टात आणली आहेत. १.२५ कोटी महिलांनी रोजगार गमावले तर जवळपास ४ कोटी परुषांचे रोजगारही गेले,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“आरोग्य सुविधांअभावी हजारो लोक तडफडून मेले”

नाना पटोले पुढे म्हणाले, “मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील परकीय गुंतवणूक रोडावली असून ज्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली होती त्यांनीही गाशा गुंडाळला आहे. नोटबंदी व जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी यामुळे छोटे, मध्यम व लघु व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. करोनामुळे मोदी सरकारच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. आरोग्य सुविधांअभावी हजारो लोक तडफडून मेले. करोनाच्या भयंकर संकटाचा लोक सामना करत असताना मोदी सरकार मात्र मदत करण्याऐवजी टाळ्या, थाळ्या वाजवण्याचे भंपक आवाहन करत होते. गंगेच्या पात्रात हजारो मृतदेह तरंगत होते हे जगाने पाहिले, पण मोदी सरकारला ते दिसले नाहीत. जनतेचे प्रचंड हाल झाले आणि जगभर भारताची नाच्चकी झाली.”

“फायद्यातील सार्वजनिक कंपन्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घातल्या”

“आठ वर्षात मोदी सरकारने एकही नवीन रोजगार निर्मिती करणारा मोठा प्रकल्प उभा केला नाही. मात्र, ७० वर्षात काँग्रेस सरकारने उभ्या केलेल्या फायद्यातील सार्वजनिक कंपन्या मात्र मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात कवडीमोल भावाने घातल्या. या कंपन्यांचे खासगीकरण करुन नोकऱ्या संपुष्टात आणल्या व तेथील आरक्षणही घालवले. देशातील २४ कोटी जनता दारिद्र्य रेषेच्याखाली गेली. मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिले जात आहे. हे भूषणावह नाही तर गरिबांच्या वाढलेल्या संख्येचा परिणाम आहे,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : ओबीसी आरक्षणासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा, कारण… : नाना पटोले

“भारत ५० वर्षे मागे गेला, हीच मोदी सरकारची कामगिरी”

“आठ वर्षातील मोदी सरकारने फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कारवाया केल्या. मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी मंदिर-मशिदी सारख्या धार्मिक मुद्द्यांना हवा दिली. धर्मा-धर्मात तेढ निर्माण केली. एका समाजाला दुसऱ्या समाजासमोर उभे करून फोडा व राज्य करा या इंग्रजांप्रमाणे राज्यकारभार सुरू केला. सर्व संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आहे. मागील ८ वर्षात प्रगतीकडे वाटचाल करण्याऐवजी भारत ५० वर्षे मागे गेला, हीच मोदी सरकारची कामगिरी ठरली,” अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.