मुंबई : मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्यानंतर राज्य सरकारकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तब्बल १५ खासदारांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण करण्यासाठी शिफारस केली.
मात्र गेली पाच वर्षे या प्रस्तावाकडे लक्ष देण्यास केंद्र सरकारला वेळ मिळालेला नाही. त्याच वेळी राज्य सरकारने पत्रव्यवहार करताच केंद्राने दोन रेल्वे स्थानकांचे नामकरण केल्याचे जाहीर केले. या प्रकारामुळे नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीचे पदाधिकारी संतप्त झाले असून मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकारने सीवूड आणि मोहापे या रेल्वे स्थानकांच्या नामकरणासाठी केंद्र सरकारला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार केंद्र सरकारने या दोन्ही स्थानकांचे नामकरण केल्याचे नुकतेच जाहीर केले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस असे नामकरण करण्याचा प्रस्ताव १२ मार्च २०२० रोजी मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला.
हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून पाच वर्षे होत आली, तरी अद्याप टर्मिनसचे नामकरण झालेले नाही. मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या नामकरणासाठी १५ खासदारांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले, रेल्वे बोर्डानेही ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले, वेळोवेळी महाराष्ट्रातील खासदार मंडळी या संदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित करीत आहेत. परंतु अद्याप केंद्र सरकारला जाग आलेली नाही.
महाराष्ट्राच्या आजी – माजी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. महाराष्ट्राच्या चार मुख्य सचिवाने गृह मंत्रालयाला स्मरणपत्रही पाठवले आहे. परंतु केंद्र सरकारकडून अद्याप नामकरणाबाबत घोषणा झालेली नाही, अशी खंत नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. मनमोहन चोणकर यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारच्या पत्राची दखल घेऊन दोन रेल्वे स्थानकांचे नामकरण केल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात येते. पण नागरिकांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असताना केंद्र सरकार मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण का करत नाही, असा संतप्त सवाल ॲड. चोणकर यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनात मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या नामकरणाची घोषणा करावी, अशी मागणी पुन्हा एकदा ॲड. चोणकर यांनी केली आहे.
दरम्यान, सातत्याने मागणी करूनही मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्यात येत नसल्याने मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
