मुंबई : मुंबई आणि मराठवाड्यादरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान साप्ताहिक एक्स्प्रेस सेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेमुळे नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांचा मुंबईकडे प्रवास अधिक सुलभ होईल. ‘लोकसत्ता’ने १० एप्रिल रोजी ‘मुंबई – नांदेड गाडी अजूनही कागदावरच’ अशा आशयाची बातमी केली. या बातमीमुळे अनेक वर्षे कागदपत्रावर असलेली एक्स्प्रेस एका महिन्यात रेल्वे मार्गावर धावण्यास सज्ज झाली.
गाडी क्रमांक १७६६५/१७६६६ हुजूर साहेब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – हुजूर साहेब नांदेड आणि गाडी क्रमांक १७६६७ /१७६६८ एलटीटी – हुजूर साहेब नांदेड – एलटीटी या रेल्वेगाड्यांना रेल्वे मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर या रेल्वेगाडीची उद्घाटन फेरी चालवून नियमित सेवा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, रेल्वे मंडळाने मंजुरी दिल्यानंतरही मुंबई – नांदेड मार्गावरील रेल्वे गाडी सुरू झाली नाही. दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही ही गाडी सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. प्रवासी वर्गाकडून आंदोलन, प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जात होता. परंतु, प्रवाशांच्या मागणीला यश आले नव्हते. ही रेल्वेगाडी सुरू करण्याबाबत ‘लोकसत्ता’ने १० एप्रिल रोजी बातमीतून वाचा फोडली. बातमीनंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. १९ एप्रिल रोजी रेल्वे विभागाने रेल्वे मंडळाशी पत्रव्यवहार करून, रेल्वेगाडी सुरू करण्यास प्राधान्य दिले.
रेल्वे प्रशासनाच्या मान्यतेनुसार गाडी क्रमांक १७६६५/१७६६६ ही नांदेड – एलटीटी – नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेसची उद्घाटन फेरी १९ मे रोजी होईल. त्यानंतर या रेल्वेची सेवा २५ मे रोजीपासून सुरू होणार आहे. तसेच, गाडी क्रमांक १७६६७/१७६६८ ही अतिरिक्त साप्ताहिक सेवा २० मे २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. या एक्स्प्रेसला पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
गाडी क्रमांक १७६६५ नांदेड – एलटीटी एक्सप्रेस नांदेडहून दर सोमवारी रात्री ९.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात एलटीटीहून दर बुधवारी दुपारी ४.३५ वाजता सुटून शुक्रवारी सकाळी ९.१० वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक १७६६७ नांदेडहून दर बुधवारी रात्री ९.१५ वाजता सुटेल, तर एलटीटीहून गुरुवारी सायंकाळी ४.५५ वाजता परतीचा प्रवास करेल.या रेल्वेगाडीला एसी टू टियर, एसी थ्री टियर, स्लीपर आणि जनरल डब्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य तसेच आरक्षित प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.
उन्हाळी सुट्ट्या, स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय उपचार, नोकरी-व्यवसाय आणि इतर कारणांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. अशा परिस्थितीत नियमित गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागत होता. नव्याने सुरू करण्यात आलेल्या एक्सप्रेसमुळे अतिरिक्त प्रवासी क्षमता उपलब्ध होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या एक्सप्रेसमुळे अतिरिक्त सुविधा मिळून प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.
