काँग्रेसने नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका तसेच ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत. नवी मुंबईत नारायण राणे तर औरंगाबादची जबाबदारी अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे.
नवी मुंबईत गणेश नाईक यांना आव्हान देण्याकरिता काँग्रेसने नारायण राणे यांना उतरविले आहे. नाईक यांनी पक्ष बदलल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादी कमकुवत होईल व त्याचा फायदा घेत पाय रोवण्याची काँग्रेसची योजना आहे. यातूनच काँग्रेसने राणे यांच्यासारख्या प्रभावी नेत्याकडे नवी मुंबईची जबाबदारी सोपविली आहे. औरंगाबादची जबाबदारी दुसरे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये यश मिळाल्यास अशोकरावांचा प्रदेशाध्यक्षपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
ठाणे जिल्हा परिषदेची जबाबदारी बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तर पालघरची जबाबदारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली.
दुष्काळग्रस्तांसाठी टोल फ्री नंबर
दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने काँग्रेसने टोल फ्री (०४०७१०१२२००) क्रमांक सुरू केला आहे.
कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढा देऊन दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी मायदेशात परतले त्याला येत्या ९ तारखेस १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ९ जानेवारीला काँग्रेसच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत प्रेरणा यात्रा काढण्यात येणार आहे.