भारतीय जनता पार्टीने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुंबईत विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विनापरवानगी आणि करोना नियमांचे उल्लंघन करून या यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत. याच संदर्भात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय लघू आणि स्मुक्ष उद्योगमंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी गुन्हे दाखल केल्याचा मला काही फरक पडत नाही असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री महाराष्ट्राला उद्धवस्त करतील अशी राणेंनी टीका केल्याचं सांगताच संजय राऊत म्हणाले…

मुंबईत गुरुवारी विविध ठिकाणी गेलेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी आदी सात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याचबद्दल छेडले असता राणेंनी अगदी आक्रमक पद्धतीने उत्तर दिलं.

“गुन्हे दाखल केल्याचा मला काही फरक पडत नाही. सात गुन्हे दाखल करा, ७० करा नाहीतर ७० हजार करा. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत मी त्यांच्या पाठीशी आहे,” असं राणे गुन्हे दाखल झाल्याच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी आम्ही ही यात्रा लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी संवाद साधण्यासाठी आयोजित केल्याचंही राणेंनी सांगितलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी यापूर्वी महाविकास आघाडीचे कार्यक्रम झाले तिथे नियमांचे उल्लंघन झालं त्यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत याकडे लक्ष वेधलं. “आम्ही पाहिलं नाही का यापूर्वी कशा सभा, मिटींग झाल्या. कार्यक्रमांना कशी गर्दी झाली. तेव्हा नाही गुन्हे दाखल झाले,” असं म्हणत राणेंनी, “तुमच्या डोक्यावर कोणतरी बसलेलं आहे. आम्ही वर आहोत तुम्ही खाली आहात,” असा टोला विरोधकांना लगावला.  पुढे बोलताना राणेंनी राजकारणामध्ये सूडबुद्धीने वागणाऱ्यांना जनता न्याय देत नाही. जनतेची सेवा करणाऱ्यांनाच ते न्याय देतात, असंही म्हटलं.

नक्की वाचा >> “अडवण्याची भाषा करणारे गोमूत्रावर आले, म्हणून…”; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला

पत्रकारांवर संतापले

राणेंनी प्रश्न विचारण्यास सांगितलं असता पहिलाच प्रश्न शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणाबद्दल विचारल्यानंतर राणे संतापले. मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे. मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारांना एक प्रतिष्ठा दिलीय. पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हालाही महत्वाचं असतं. तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. कालपासून मी एवढ्या विषयांवर बोललोय पण मला पत्रकार देशातील प्रश्नाबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल विचारताय. मला कोणासमोर नमस्कार करावा वाटतो हा माझा प्रश्न आहे. का गोमूत्र शिंपडलं काय दुषीत झालं होतं? हे तुम्ही त्यांना विचारा, असं उत्तर राणेंनी या प्रश्नाला दिलं.