केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवाबद्दल केलेल्या विधानावरुन टीका केली आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं. दसरा मेळाव्यातील भाषणामधील अनेक मुद्द्यांवरुन राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. याचवेळी त्यांनी शिंदेंचा दीड वर्षांचा नातू रुद्रांक्ष आणि मुलगा श्रीकांतबद्दल विधान केलं. या विधानावरुन आता भारतीय जनता पार्टीकडून तसेच शिंदे गटाकडून निषेध व्यक्त केला जात असतानाच राणेंनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.

नक्की वाचा >> ४२ कोटींचा उल्लेख करत नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबद्दल खळबळजनक दावा! ‘खोके’ टीकेवरुन म्हणाले, “ते पैसे व्हाइट करण्याचं…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबावर शेलक्या शब्दात प्रहार केल्याचं पहायला मिळालं. “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,” असा उल्लेख उद्धव यांनी आपल्या भाषणात केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या उल्लेखासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंना भाषण सुरु असतानाच एका चिठ्ठीच्या माध्यमातून कळवण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी मुलगा श्रीकांत आणि नातू रुद्रांक्ष यांचा उल्लेख केल्याची चिठ्ठी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांचा संताप अनावर झाल्याचे पहायला मिळाले.

नक्की वाचा >> शिंदेंनी दर्शन न घेतल्याने देवीचं विसर्जन थांबवलं: मनसेचा मंडळाला इशारा; “देवापेक्षा CM मोठे झाले का? विसर्जन करा अन्यथा…”

“माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर. कोणत्या पातळीवर पोहोचला आहात? पायाखालची वाळू सरकली ना. तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो का? लाज तुम्हाला वाटायला हवी होती,” असा टोला शिंदेंनी वांद्र-कुर्ला संकुलामधील आपल्या भाषणातून ठाकरेंना या टीकेवरुन लगावला.

नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

याच टीकेवरुन भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यासारख्या नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांमध्ये आता नारायण राणेंचाही समावेश झाला आहे. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंनी शिवसेना उभारण्यात काय हातभार लावला असा प्रश्न विचारताना या मुद्द्याचा उल्लेख केला. “शिवसेना वाढवण्यासाठी शिवसैनिकांनी दिवस-रात्र एक केला. तू कधी गेला का कुटुंब, मातोश्री सोडून? कोणाला कनाफाटीत तरी मारली का कधी? याचं योगदान काय शिवसेना वाढवण्यात? १९९२ मध्ये दंगली झाल्या तेव्हा हा कुठे होता. तू कधी कोणावर हात उचलू शकत नाही. ना पूरातून कोणाचा जीव वाचवला, ना पाच किलो धान्य दिलं,” असा एकेरी उल्लेख करत राणेंनी संताप व्यक्त केला.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या मुद्द्यावरुन बोलताना राणेंनी, ” एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला त्याचा अधिकार, हक्क, त्याची मेहनत आहे. शिवसेना कानाकोपऱ्यात पोहचली ती एकनाथ शिंदे, नारायण राणेमुळे पोहोचली. तू आयत्या बिळावर नागोबा आहेत. तू काही कामाचा नाही,” असं उद्धव यांना उद्देशून म्हटलं. तसेच शिंदेंच्या नातावाचं नाव घेऊन उद्धव यांनी केलेल्या उल्लेखावरुन शिंदेंचा नातू उद्या नगरसेवक झाला तरी त्याच्या आजोबांनी आणि बापाने केलेल्या मेहनतीमुळे होईल, असं राणे म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून म्हणाले, “तुमचा मुलगा…”

“अरे दीड वर्षांचा नातू ना तो. लाज नाही वाटली बोलायला. तो कुणाचा मुलगा आहे, दीड वर्षाचा आहे (याचा विचार नाही केला). उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या बापाने आणि आजोबाने मेहनत घेतली म्हणून होईल,” असं राणे संतापून म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा एकेरी उल्लेख करत, “याने काय घेतलीय मेहनत? हा फक्त रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि पाटणकर एवढ्यांमध्येच. पाटणकर काही न करता मालक. तुला एकाही शिवसैनिकाची आठवण का झाली नाही? कुठल्या सैनिकाला मदत केली का? मराठी माणसासाठी काय योगदान दिलं?” असे प्रश्न उद्धव यांना विचारले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane slams shivsena chief uddhav thackeray for talking about cm eknath shinde grandson scsg
First published on: 07-10-2022 at 16:44 IST