केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. तर, आज ही यात्रा वसईमध्ये सुरू असताना मध्येच नारायणे राणे हे वसईचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला गेल्याने, भाजपा कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसून आले. राणेंनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी गोंधळ देखील घातला. मात्र तरी देखील नारायण राणे ठाकूर यांना भेटायला गेले, तर आमदार ठाकूर यांनी देखील राणे यांचे स्वागत करत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास राणे यांची जनआशिर्वाद यात्रा विरार येथे पोहोचली. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितीज ठाकूर राणे यांच्या स्वागताला गेले. त्यांनी राणे यांच्या पाया पडून अभिवादन केले आणि भेटीला बोलावले. तर, राणे यांनी हितेंद्र ठाकूरांना भेटायला जाऊ नये असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला. मात्र राणे ठाकूरांना भेटायला विवा महाविद्यालयात गेले. यामुळे कार्यकर्त्यांनी बराच गोंधळ घातला. एवढेच नाही तर आमदार ठाकूर यांनी नारायण राणे हे आमचे मार्गदर्शक आहेत, असे सांगत त्यांचे कौतुकही केले. या सर्व प्रकारामुळे भाजपा कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसून आले.

इतके दिवस मेहनत करून यात्रेचे आयोजन केले आणि एका क्षणात बट्ट्याबोळ केला अशी प्रतिक्रिया एका भाजप नेत्याने दिली. ज्यांच्याविरोधात लढायचं आहे त्यांचीच गळाभेट घेणे हे कार्यकर्त्यांना नाउमेद करणारं लक्षण आहे असे या नेत्याने सांगितले. ठाकूर आणि राणे यांची भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.