मुंबई : मुंबई अंमली पदार्थ तस्करीचा राजधानी होत आहे. मुंबई अंमली पदार्थ सेवनाचे हब झाले आहे. मुंबई उडता पंजाब प्रमाणे उडती मुंबई होत आहे. पाकिस्तानला भारतात अंमली पदार्थाचे जाळे विणून तरुणाईला बरबाद करायचे हे एक मोठे षडयंत्र आहे. भारताशी थेट दोन हात करता येत नाहीत म्हणून पाकिस्तान ने ही चाल खेळली आहे. कोण म्हणते असे. मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांचे हे मत आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने शुक्रवारी केलेल्या मोठया कारवाईत पावनेदोन हजार कोटी रुपये किंमतीचे ३४९ किलो कोकेन जप्त केले. ही कारवाई मुंबई महानगर प्रदेशातील (कळंबोली, भिवंडी) येथील साठवण केंद्रातून झाली. कोकेन हे सर्वात महाग अंमली पदार्थ आहे. त्याची विक्री चित्रपट जगतात मोठया प्रमाणात होते. आतापर्यत जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थाची टक्केवारी पाच ते दहा टक्यापर्यंत असल्याने हे एक ‘हिमनगाचे टोक’ असल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
केंद्र सरकारने मार्च २०२९ पर्यंत ‘अंमली पदार्थ मुक्त’ भारत करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी देशात अनेक ठिकाणी कारवाया केल्या जात आहेत. शुक्रवारी मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईचा पाठलाग गेली सहा महिने केला जात होता. या कारवाईचे अभिनंदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
केवळ पैशासाठी देशातील तरुण पिढी नष्ट केली जात आहे. या सर्व तस्करीत नामांकित मंडळी गुंतलेली असल्याचे सांगितले जाते. बनावट नोटांनी भारताचा अर्थव्यवस्था खिळखिळ करणाऱ्या पाकिस्ताने आता भारतातील तरुण पिढी अशा प्रकारे नष्ट करण्याचा विढा उचलला आहे का अशी भिती या पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पंजाब मधील तरुणाई यापूर्वी अशा प्रकारे व्यसनाधीन झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील तरुण पिढीला लक्ष करण्यात आले आहे. देशाच्या आणि राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत अंमली पदार्थांचे लोण पसरले आहे. कोकणातील अडगळीत असलेल्या साध्या गावातही आता चरस, गांजा सारखी अंमली पदार्थ मिळत आहेत. मुंबईत एमडीएमए, कोकेन, हेराॅईन, गांजा, चरस, मेथ, आईस, यासारखे अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. सिंथॅक्टीक अंमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. समाजमाध्यमांवर या अंमली पदार्थांची विक्री केली जाते. काॅन्सर्ट मध्ये हे अंमली पदार्थ सर्रास मिळतात. लहान मुले व दुर्दम्य आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी उपयोग केला जात आहे. मुंबईतील व्यसनाधीन तरुणांची हे अंमली पदार्थ खरेदीची क्षमता असल्याने मुंबई हे अंमली पदार्थांचे हब झाले आहे.
मुंबई बंदर असल्याने तस्करीचे एक साधन असून यात आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने केलेली कारवाई ही हिमनगाचे एक टोक आहे. मुंबईत आजच्या घडीस वीस ते पंचवीस हजार कोटीचा व्यापार अंमली पदार्थांचा सुरु असल्याची चर्चा आहे.
