मुंबई : ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या वरसावे गावातील आदिवासींची जमीन बेकायदा पद्धतीने सेव्हन इलेव्हन प्रा.लि. कंपनीने २०१७ मध्ये खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही जमीन परत आदिवासींना दिली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

‘सेव्हन इलेव्हन’ कंपनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांची आहे. या कंपनीने आदिवासींकडून जमीन खरेदी केली होती. याप्रकरणी विरोधकांच्या २९३ च्या चर्चेमध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजप आमदाराने आदिवासींच्या जमिनी बेकायदा पद्धतीने विकत घेतल्याचा आरोप केला होता.

यासंदर्भात उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, मिरा भाईंदरची जमीन ब्रिटिश काळात भाडेपट्ट्याने दिली होती. ही वर्ग २ ची जमीन आहे. मात्र इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी या जमिनीवर आपली मालकी असल्याचा दावा करते. मुंबई उच्च न्यायालयातून या कंपनीच्या बाजुने निवाडा आला. सरकारने यासंदर्भात दाद मागितली आहे. ९ हजार एकरपैकी १५०० एकर जमीन कंपनीकडे शिल्लक आहे. ही जमीन आम्ही वर्ग दोन मध्ये रुपांतर करणार, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगतिले.

मिरा भाईंदर मधील ‘मीरा साल्ट’ कंपनीने येथील ३१८ एकर जमिनीवर मालकीचा दावा केला आहे. १५ हजार कोटींची ही जमीन आहे. ही जमीन भाडेपट्ट्याची आहे. पण, मुंबई उच्च न्यायायलाने कंपनीच्या बाजुने निवाडा दिला. सरकारने नुकतीच ही जमीन वर्ग दोनची केली आहे. तसेच राज्यात १ लाख ६३ हजार हेक्टर जमिनी देवस्थानच्या आहेत. अनेकांनी त्यावर कब्जा मिळवला आहे. आपण त्यासंदर्भात कायदा आणून त्या जमिनी सोडवत आहोत. राज्यातील शर्तभंग करुन वर्ग १ च्या जमिनी तपासून त्या वर्ग दोनच्या करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.

कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गच्या शेजारी ‘मोपा’ विमानतळ आहे. या विमानतळाशेजारी हजारो परप्रांतीयांनी कुळकायद्याचे उल्लंघन करत जमिनी खरेदी केल्या आहेत. याची विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती चौकशी करणार आहे. ज्यांनी बेकायदा पद्धतीने जमिनी खरेदी केल्या आहेत, त्या सरकारजमा होतील. समितीचा अहवाल व त्यावर अनुपालन अहवाल आगामी अधिवेशनात सादर केला जाईल, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तुळजा भवानी देवस्थानच्या जमीन घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फ चौकशी केली जाईल, असे बावनकुळे म्हणाले.