मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या वाटचालीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास देशाच्या राजकारणातील महत्त्वाचा अध्याय ठरला असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा हा टप्पा केवळ एका नेत्याच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव नाही. भारताच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रवासाचे प्रतिबिंब असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आणि शिवसेनेच्या वतीने त्यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदी यांची २५ वर्षांची वाटचाल ही सेवा, संकल्प आणि समर्पणाची यात्रा आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हा संकल्प केंद्रस्थानी ठेवून त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे १४० कोटी भारतीयांच्या आत्मविश्वासाला नवी उंची मिळाली, असे शिंदे यांनी म्हटले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून सुरू झालेल्या मोदी यांच्या प्रवासाने देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. या कालखंडात देशाच्या विकासाला नवी दिशा देण्यासोबतच भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोदी यांची आगामी वाटचाल अधिक यशस्वी आणि गौरवशाली ठरावी, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.
