नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गोटात सामील होणाऱ्या शिवसेना खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी घेतल्यानंतर आता सेनेकडून सारवासारव करण्यात आली आहे. माध्यमांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये सत्याचा विपर्यास करून पंतप्रधानांनी शिवसेनेला फटकारले, ठणकावले , शिवसेनेची तलवार म्यान झाली, असा खोटा प्रचार केला जात असल्याचे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत मोर्चात का सहभागी झालो, यामागची आमची भूमिका आम्ही पंतप्रधानांसमोर मांडली. त्यावर पंतप्रधानांनी ‘ आम्ही तुम्हाला कसे काय सोडू शकतो, वर गेल्यानंतर तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर द्याल ते माहित नाही. मात्र, मी वर गेल्यानंतर बाळासाहेबांना काय उत्तर देणार, असे भावूक उद्गार पंतप्रधानांनी काढल्याचे निवदेनात म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, या निर्णयात शिवसेनेची साथ हवी असल्याचे वक्तव्य केल्याचे आनंदराव अडसूळ यांनी सांगितले. मात्र माध्यमांनी चुकीची बातमी देत मोदींनी शिवसेनेला खडसावले असे वृत्त दिले, ते साफ खोटं असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. दरम्यान, सरकारकडून जिल्हा बँकांसाठी २१ हजार कोटी रूपये देण्याचा निर्णय केवळ शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच घेतल्याचा दावाही अडसूळ यांनी केला आहे.

[jwplayer KmEBhKz4]

नोटाबंदीच्या निर्णयाने त्रस्त झालेले सर्वसामान्य आणि शेतकरी वर्ग, जिल्हा सहकारी बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी घातलेली बंदी अशा विविध मुद्यांसंदर्भात शिवसेना खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचा अधिकृत तपशील उपलब्ध झाला नसला तरी यावेळी मोदींनी शिवसेना खासदारांना शाब्दिक चिमटे काढल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. तुमचा विरोध असला तरी तुम्हाला आमच्यासोबतच राहायचे आहे असेही त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना सांगितले. नोटाबंदीवरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून यावरुन शिवसेनेने नोटाबंदीवरुन भाजपवर टीका केली आहे. नोटाबंदीविरोधात ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या मोर्चात शिवसेना नेत्यांनी सहभाग घेत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला होता.

shivsena-clarification-compressed
दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सावध प्रतिक्रिया दिली होती. नरेंद्र मोदींच्या मनात बाळासाहेबांविषयी असलेल्या आदराबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे ते म्हणालेत. पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून त्यांनी जनतेला भेडसावणा-या प्रश्नांचे त्यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. उत्तर मिळाल्यावर सर्वसामान्यांचे जीवन सुरळीत झाल्यास बाळासाहेबांना आनंद होईल, असे उद्धव यांनी म्हटले होते.

[jwplayer V3TJzYWZ]