अमित शहांची स्तुतिसुमने; स्वामी विवेकानंदांच्या कार्याशी तुलना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ‘जागतिक नेते’ बनले असून जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांना पाठिंबा मिळत आहे. स्वामी विवेकानंदांनंतर जगभरात देशाचा नावलौकिक वाढविण्याचे कार्य मोदी करीत असल्याची स्तुतिसुमने उधळणारे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे केले. तुष्टीकरण, घराणेशाही आणि जातीयवादाचे राजकारण संपवून खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्ये रुजवून ती सुदृढ करण्याचे काम मोदी यांच्या कार्यकाळात होत असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. मोदी कार्याचे विविध पैलू उलगडणाऱ्या हिंदूीतील पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने २०१९च्या आगामी लोकसभा निवडणूक प्रचार तयारीची झलकच या वेळी दिसून आली.




मोदी यांच्या जीवनावरील ‘हमारे नरेंद्रभाई’ या किशोर मकवाना यांच्या गुजराती भाषेतील २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा हिंदूी भावानुवाद हर्षां र्मचट यांनी केला आहे. त्याचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या कार्यकाळात भारताला जगभरात फारशी प्रतिष्ठा मिळत नव्हती. पंतप्रधानांना फारसे महत्त्व नव्हते आणि प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होते, असा टोला लगावत शहा यांनी मोदी यांना अमेरिका, ब्रिटन, इराण, भूतानसह अनेक देशांमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा व स्वागताचा उल्लेख केला. हा मोदी किंवा भाजपचा नाही, तर देशाच्या जनतेचा गौरव वाढविण्याचे काम मोदी यांनी केले आहे. ते आता जागतिक पातळीवरचे नेते झाले आहेत, असे शहा यांनी सांगितले.
मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या नात्याने केलेली कामगिरी सर्वाना माहीत आहे, पण १९९५ मध्ये गुजरातमध्ये ते पक्षाचे सरचिटणीस होते. संघटना वाढविण्याचे आणि हजारो कार्यकर्ते घडविण्याचे काम मोदी यांनी केले. संघटना मजबूत करून गुजरातमध्ये ११ जागांवरून थेट सत्तेपर्यंत मजल मारून दाखविली, असेही शहा म्हणाले.