जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास असलेला विरोध थेट पंतप्रधानांच्या समोर मांडण्याचे शिवसेनेचे मनसुबे फारसे सफल झालेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेनेच्या मागणीस अद्याप कोणताच प्रतिसाद न दिल्याने जैतापूर विरोधाचा गजर पंतप्रधानांच्या निवासस्थानी करण्याची सेनेची इच्छा अजून तरी अधांतरीच राहिली आहे. जैतापूर विरोधामागील भूमिका, प्रकल्पामुळे होणारे दुष्परिणाम आणि स्थानिक रहिवाशांची कैफियत मांडण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी मोदी यांच्याकडे ५ ते ८ मे दरम्यान भेटीची वेळ मागितली होती. मात्र, पाच मे उलटून गेल्यानंतरही या मागणीवर पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याने सेनेच्या गोटात नाराजी व्यक्त होत आहे. कोणत्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प पूर्ण करण्याचे मोदी यांनी ठरविले असल्याने प्रकल्पाच्या फेरविचाराची मागणी त्यांनी याआधीही धुडकावली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
