मुंबई : आपला प्रचार, विरोधकांबाबत अपप्रचार करण्यासाठी वारंवार रेटून बोलण्याची हिटलरनीती केंद्रातील भाजप सरकारने अवलंबलेली आहे. ज्या प्रकारचे कार्यक्रम (इव्हेंट) हिटलर करायचा, त्याच प्रकारचे कार्यक्रम आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलचा मेळावा मुंबईत पार पडला, त्यात ते बोलत होते. शिवसेनेशिवाय सोशल मीडिया पुढे जाऊ शकत नाही. बाळासाहेब आमचे फेस होते, त्या वेळी सोशल मीडिया कुठे होती? हिटलर सगळय़ांना प्रिय होता, बाळासाहेबांनादेखील आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरचे अनुकरण करतात. ज्या प्रकारचे कार्यक्रम हिटलर करायचा त्याच प्रकारचे कार्यक्रम मोदी करत आहेत, असे म्हणत मी टीका करत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.