मुंबई : समाज माध्यमावर प्रसिद्ध असलेल्या नरगिस फ्रुटवाला या महिलेने राज ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत. उबेर प्रवासादरम्यान नरगिस यांची सुमारे ४ लाख रुपयांची शूटिंग बॅग हरवली होती. मात्र अवघ्या २४ तासांत मनसैनिकांमुळे ही बॅग परत मिळाल्यामुळे तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाहीर आभार मानले आहेत. “ही फक्त मदत नव्हती, तर माणुसकी आणि तत्परतेचे उदाहरण आहे, अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडिया एनफ्लूएन्जर नरगिस फ्रुटवाला यांची एक ध्वनी चित्रफीत समाज माध्यमावर फिरत असून यात त्यांनी आपल्याला उबेर प्रवासादरम्यान आलेल्या एका अनुभवाबाबत सांगितले आहे. फ्रूटवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका उबेर गाडीने प्रवास करत असताना त्या आपली शूटिंग बॅग गाडीत विसरल्या होत्या. या बॅगेमध्ये कॅमेरासह सुमारे ४ लाख रुपयांचे चित्रीकरणाचे साहित्य होते. काही वेळानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर तिने संबंधित कॅब चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कॅमेरा परत देण्यास नकार दिल्याचा आरोप नरगिसने केला आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून मदत केल्याचे नरगिस यांनी म्हटले आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि वर्सोवा येथील पदाधिकारी संदेश देसाई तसेच लक्ष्मण वाघमोडे यांचे आभार मानले.

नरगिस यांनी सांगितले की, या प्रकरणी त्यांनी चेंबूर, आरसीएफ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेतली. मात्र, पोलिसांनी चालकाला बोलावूनही तो हजर न झाल्याने त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बॅग मिळण्याची आशा उरली नव्हती. दरम्यान, निराश झालेल्या फ्रूटवाला यांना त्यांच्या मित्राने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत संपर्क साधण्याचा सल्ला दिला. नसेच्या वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यांनी तपास करून नवी मुंबई परिसरात कॅब चालकाचा शोध घेतला. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी चालकाच्या घराची झडती घेतली आणि कॅमेरा ताब्यात घेतला. कॅमेरा व बॅग नरगिस यांना सुपूर्द करण्यात आली असून नरगिस यांनी आभार मानले आहेत. “ही फक्त मदत नव्हती, तर माणुसकी आणि तत्परतेचे उदाहरण आहे “, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.