मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने सरकारची अब्रू गेली असून मंत्री झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांवर असतानाच नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातच लाचखोरीचे प्रकरण घडल्याने विरोधकांनी सरकारवर आरोप केला आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस, शिवसेनेने केली आहे.

निष्पक्ष चौकशीसाठी तत्काळ राजीनामा द्यावा – हर्षवर्धन सपकाळ

भाजपा महायुतीने मंत्रालयाचे भ्रष्टाचारालय केले आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे, हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवाळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली आहे मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

पकडले गेलेले किरकोळ, सूत्राधारापर्यंत पोहोचायला हवे – संजय राऊत

मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालायात झालेले लाचखोर प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मुळात झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन विभागातले काय कळते, हे मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. कुठला ट्रक सोडा, कुठला कंटेनर सोडा असे अधिकाऱ्यांना ते फोन करून सांगत असतात. त्यामुळे जे पकडले गेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत. त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचायला हवे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

लाचखोरीमागे भाजप – यशोमती ठाकूर

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणामागे भाजपचा हात आहे. झिरवाळ यांच्या कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना पकडणे हे भाजपचे राजकीय षडयंत्र असू शकते. विरोधकांना आणि मित्रपक्षांना बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणे हा यांचा जुना धंदा आहे. स्वत: ‘टक्केवारी’च्या चिखलात रुतलेल्या सरकारने दुसऱ्यावर चिखलफेक करू नये. हे टक्केवारीचे सरकार असून प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात उघडपणे टक्केवारी मागितली जाते, अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली.

…तर राजीनामा देईन – नरहरी झिरवाळ

मंत्रालयातील आपल्या दालनात लिपिकला लाच घेताना रंगेहाथ पकडले जाण्याचा प्रकार चुकीचाच आहे. माझ्यावर याची जबाबदारी असून या लाचखोरी प्रकरणाची पाळेमुळे जर माझ्यापर्यंत आली तर मी निश्चितच राजीनामा देईन, अशी भूमिका अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मांडली. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. तसेच या प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लाच घेताना पकडला गेलेला ढेरंगे हा लिपीक म्हणून काम करतो. सुनावणीची कागदपत्रे बनविण्याचे काम त्याच्याकडे आहे. ढेरंगे मूळचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसनवारी तत्त्वावर घेतले आहे. त्याला पाठिशी घालण्यात येणार नाही. घडलेला प्रकार अतिशय चुकीचा आहे. माझ्या मंत्री कार्यालयातील खासगी सचिव किंवा विशेष कार्य अधिकारी यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे झिरवाळ म्हणाले.

राष्ट्रवादीचेच मंत्री वादग्रस्त

विविध आरोप किंवा न्यालायाने दोषी ठरविल्याने माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे या राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. यापाठोपाठ नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे राष्ट्रवादीचेच मंत्री वादग्रस्त ठरले आहे. झिरवळ यांच्यास्वीय सचिवांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. काही जणांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या.