मुंबई: अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची चित्रफितीद्वारे बदनामी करणे ॲड. संजय यादव याला भोवले आहे. राज्यस्तरीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळावरील अशासकीय सदस्य ॲड. पवन यादव यांची अखेर राज्य सरकारने हकालपट्टी केली. सामाजिक न्याय विभागाने शासन आदेश काढत त्यांची नियुक्ती तत्काळ रद्द केल्याचे जाहीर केले. मंत्री झिरवाळ यांच्या बदनामी प्रकरणात सहभाग असल्यानेच सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थेतील तृतीयपंथी (ट्रान्सवुमन) व्यक्ती या प्रवर्गातून पवन यादव याची मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय धोरण २०२४ अंतर्गत मंडळाची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये यादव याची नियुक्ती झाली होती. मात्र, महिनाभरातच सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागण्याची नामुष्की ओढवली आहे. नियुक्तीनंतर काही तृतीयपंथीय संघटनांनी त्याच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. प्रतिनिधित्वाच्या निकषांबरोबरच राजकीय दबाव आणि वादग्रस्त हालचालींबाबत सरकारकडे तक्रारी पोहोचल्या होत्या. दरम्यान, मंत्री झिरवाळ यांच्याशी संबंधित संवेदनशील माहितीच्या आधारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, अखेर नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव विवेक शिंदे यांनी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.

यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. मंत्री झिरवाळ यांची अश्लील चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तृतीयपंथी पवन यादव यांचे बंधू रवी यादव यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती मंत्री झिरवाळ हेच आहेत. माझा भाऊ पवन यादव यानेच हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे, असे म्हटले आहे. पवन याने अनेक आमदार आणि राजकीय नेत्यांबरोबर संबंध ठेवले असून त्याच्या मोबाईलमध्ये त्या संदर्भातील व्हिडीओ असल्याचे तो म्हणाला होता.