मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या समाज माध्यमावर प्रसारीत झालेल्या अश्लील चित्रफितीची राज्य सरकार सत्यता पडताळणार आहे. चित्रफितीची शहानिशा झाल्यानंतर याप्रकरणी कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाने झिरवाळ यांना अभय दिले असले तरी शिवसेना शिंदे गटाने मात्र झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी झिरवाळ यांची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर झिरवाळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती. या वादानंतर माध्यमांपासून दूर राहिलेल्या झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करीत त्यांची बाजू मांडली.
झिरवाळ यांच्या अश्लील चित्रफीतीच्या संदर्भात विचारण्यात आले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला झिरवाळ यांनी दूरध्वनी केला होता. सदर चित्रफीत अनेक तुकडे जोडून बनवलेली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलीसांत तक्रार द्या, असा सल्ली मी त्यांना दिला आहे. जी घटना समोर आली आहे ती गंभीर आहे. त्याची सत्यता तपासली जाईल. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी याप्रकरणी योग्य तो निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आश्चर्य म्हणजे याप्रकरणी झिरवाळ यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. दोन महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात ३५ हजाराची लाच स्वीकारताना लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यांच्या खाजगी सचिवाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर अश्लील चित्रफीत समोर आली. या चित्रफीतीमध्ये तृतीयपंथी व्यक्ती झिरवाळ यांच्या शयनकक्षात दिसते आहे.
राजीनाम्याची शिंदे गटाची मागणी
झिरवाळ यांच्या या अश्लील चित्रफीत प्रकरणावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही. याप्रकरणी झिरवाळ यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्याची शक्यता नाही, असे राष्ट्रवादीतील सुत्रांनी सांगितले. शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी आज पत्रकार परिषदेत मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. झिरवाळ यांनी नैतिकतेच्या मुद्यावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा, असे शायना यांनी म्हटले आहे.
खरात प्रकरणी कारवाई : मुख्यमंत्री
भोंदू अशोक खरात प्रकरणी पीडितेच्या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहेत. यामुळे खरात प्रकरणातील तपास कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे पिडीत तक्रार देण्यासाठी पुढे येणार नाहीत. अशा चित्रफिती कोणी समाज माध्यमावर प्रसारित केल्यास संबधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
