मुंबई : राज्याचे अन्न व औेषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अश्लील चित्रफीतवरून वातावरण तापले असता स्वतः झिरवाळ यांनी काहीही खुलासा केलेला नाही. त्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे.

मंत्री झिरवाळ यांनी या प्रकरणी संपर्क साधूनही कोणताही खुलासा केला नाही तसेच पोलिसांत याची तक्रारही दिलेली नाही. मंत्री झिरवाळ यांच्यासोबतची १० मिनिटांची आक्षेपार्ह चित्रफिती दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर मंत्री झिरवाळ यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

झिरवाळ यांच्याबरोबरचा तृतीयपंथीयाचा खंडणी उकळण्याचा अनेक वर्षे उद्योग सुरू आहे, असा आरोप त्याचा भावाने केला आहे. या भावानेच ही चित्रफीत प्रसारित केली आहे.

मंत्रीपदाची जागा खाली करण्यासाठीच माजी मंत्र्याकडून प्रयत्न -वडेट्टीवार

अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदाची जागा खाली करून घेण्यासाठीच एका माजी मंत्र्याकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एका पेन ड्राइव्हमध्ये राज्यातील किमान तीन मंत्र्यांची विकेट जाईल, अशा गंभीर स्वरूपाच्या व्हिडीओ क्लिप्स त्यात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जे नको आहेत, त्यांनाच लक्ष्य केले जात आहे. प्रत्येकाला दुसऱ्याची जागा बळकावयाची आहे. त्यामुळे मंत्रीपद टिकवण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. एकाची विकेट गेली की दुसरा तयारच असतो. त्यामुळे एकमेकांची विकेट काढण्याची चढाओढ सुरू आहे. एक पेन ड्राइव्ह समोर आल्यास किमान तीन मंत्र्यांची विकेट जाईल, इतक्या गंभीर स्वरूपाच्या व्हिडीओ क्लिप्स त्यात आहेत. सोयीच्या क्लिप्सच बाहेर आणल्या जात आहेत. मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी संपूर्ण माहिती समोर येत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.