मुंबई: मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सागरी पर्यटनाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. नरिमन पॉइंट परिसरात फ्लोटिंग जेट्टी आणि मरीना उभारण्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाला चालना देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील महागड्या खासगी यॉट, स्पीडबोट आणि लक्झरी बोटींसाठी स्वतंत्र बर्थिंग सुविधेचा मार्ग मोकळा होणार आहे.
भविष्यात याच भागात एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालय स्थलांतरीत होणार आहे.मुंबईत सध्या खासगी यॉट आणि मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींसाठी पुरेशा आणि सोयीस्कर मरीनाची जागा नाही. गेटवे ऑफ इंडियासह उपलब्ध जेट्टींचा वापर प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि खासगी बोटींसाठीही होत असल्याने गर्दी आणि व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होतो. गेटवे परिसरातील जेट्टींचा वापर यॉट मालक आणि ऑपरेटरही करीत असल्याने या ठिकाणी जलवाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर नरिमन पॉइंट येथील प्रस्ताव महत्त्वाचा आहे.
प्रस्तावित मरीनामध्ये केवळ बोटी उभ्या करण्याची सुविधा नसून यॉट क्लब, रेस्टॉरंट, कॅफे, प्रदर्शनासाठी जागा, सेमिनार सुविधा आणि अन्य पर्यटनविषयक सोयी विकसित करण्याची संकल्पना आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून राबविण्याची शक्यताही मांडण्यात आली आहे. समुद्रातील कामांसाठी सुमारे २४३ कोटी रुपये आणि जमिनीवरील सुविधांसाठी १५ कोटी रुपयांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला आहे.
नरिमन पॉइंटच्या समुद्रकिनारी मरीनाची संकल्पना नवीन नाही. केंद्राच्या सागरमाला गुंतवणूक प्रकल्पांच्या यादीतही एनसीपीए समोर जेट्टीचा प्रस्ताव आहे. मुंबईच्या सुधारित विकास आराखड्यात नरिमन पॉइंट-कफ परेड समुद्रकिनारी मरीनाची तरतूद आहे. या प्रकल्पाला पर्यावरण, सीआरझेड, वाहतूक, किनारपट्टीची सुरक्षितता आणि सार्वजनिक वापराचे प्रश्न तपासावे लागणार आहेत. महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून ही तपासणी सुरु आहे.
फ्लोटिंग जेट्टीसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आणि तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. ही सुविद्या अलीबाग, रेवस मांडवा, उरण भागात शेतघरे असलेल्या उद्योजक, व्यवसायिक, राजकारणी, यांच्यासाठी सोयीची ठरणार आहे. राज्य सरकार मुंबईत व्यापक जलवाहतूक व्यवस्था उभारण्यावरही भर देत आहे. नरिमन पॉइंटसह मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील विविध ठिकाणांना जोडणाऱ्या जलवाहतूक मार्गांचा अभ्यास सुरू आहे.
