प्रदूषण रोखण्यासाठी समांतर सागरी मार्गावर ८२ हेक्टर जागेवर बगिचा बहरणार

या मार्गावरून ११ ठिकाणांहून मुंबईतील विविध भागांमध्ये प्रवेश करता येणार आहे

भविष्यात वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नरिमन पॉइंट ते मालाड दरम्यान होऊ घातलेल्या समांतर सागरी मार्गावर विविध ठिकाणी तब्बल ८२ हेक्टर जागेवर बगिचा साकारण्यात येणार असून मुंबईकरांना सकाळी-संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी नवी ठिकाणे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर या मार्गावरून ११ ठिकाणांहून मुंबईतील विविध भागांमध्ये प्रवेश करता येणार आहे.
सागरी समांतर मार्ग प्रकल्प उभारण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे सोपविण्यात आली असून या मार्गाचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. ‘महाराष्ट्र किनारी व्यवस्थापन प्राधिकरणा’पुढे महापालिकेने नुकतेच या प्रकल्पाचे सादरीकरण केले. प्राधिकरणाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या प्रकल्पाला गती येणार आहे.
मुंबईला समांतर सागरी मार्ग कोणत्या मार्गाने जाणार, मार्गामध्ये कोणते अडथळे आहेत, ते कसे दूर करणार, या मार्गातील हवा, पाणी, ध्वनिप्रदूषणाची आताची स्थिती काय आहे आणि प्रकल्प उभारण्यात आल्यानंतरची प्रदूषणाची परिस्थिती कशी असणार, प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आदींबाबत पालिकेने प्राधिकरणासमोर सादरीकरण केले.
पूर्वी नरिमन पॉइंट ते प्रियदर्शनी उद्यानापर्यंत बोगदामार्गे सागरी समांतर रस्ता जाणार होता, परंतु सागरी संपत्तीला धोका निर्माण होऊ नये, ही बाब लक्षात घेऊन आता गिरगाव चौपाटीवरील तांबे चौकापासून प्रियदर्शनी उद्यानापर्यंत बोगदा करण्यात येणार आहे.
त्यामुळे नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी या दरम्यानच्या सागरी संपत्तीला कोणताही धोका निर्माण होणार नाही. सागरी समांतर मार्गावर सुमारे ८२ हेक्टर जागेमध्ये उद्याने साकारण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षवल्लींचे संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यास मदत होऊ शकेल. सागरी समांतर मार्गावर येण्यासाठी आणि त्यावरून मुंबईत अन्य ठिकाणी जाता यावे यासाठी ११ ठिकाणी मार्गिका करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिका असेल, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीलाही गती मिळेल, असा विश्वास पालिका आयुक्त अजय मेहता आणि अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र किनारी व्यवस्थापन प्राधिकरणापुढे प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची संधी पालिकेला तात्काळ मिळाली आहे. या प्रकल्पाला प्राधिकरणाकडून लवकरच परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे.
जितक्या लवकर परवानगी मिळेल, तितक्या लवकर या प्रकल्पाचे काम सुरू करता येईल आणि मुंबईकरांना वाहतुकीचा जलद मार्ग उपलब्ध होऊल, असे संजय मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

एकाच्या मोबदल्यात तीन झाडे
या मार्गात वर्सोवा ते कांदिवली दरम्यान असलेली खारफुटी वादाचा विषय ठरण्याची शक्यता होती, परंतु खारफुटीचे एक झाड तोडल्यानंतर त्याच्या बदल्यात तीन झाडे लावण्यात येणार आहेत. खारफुटीचे दाट जंगल असलेल्या काही भागांतून पूलसदृश व्यवस्था करून हा मार्ग पुढे नेण्यात येणार आहे. त्यामुळे खारफुटीला कोणताही धोका पोहोचणार नाही, असेही संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.

विरंगुळ्याची नवी ठिकाणे
सागरी समांतर मार्गावर सायकलिंगसाठी स्वतंत्र मार्गिका, मॉर्निग वॉक अथवा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना विरंगुळ्यासाठी नवी ठिकाणे उपलब्ध होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nariman point to malad coastal garden to reduce pollution in mumbai