मुंबई : लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे याकरीता केंद्र सरकारने आणलेले ‘नारीशक्ती वंदन’ हे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याचे पडसाद सोमवारी मुंबई महापालिका सभागृहातही उमटले. सत्ताधारी भाजपचे सर्व नगरसेवक काळ्या कपड्यांमध्ये महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते. सभागृह नेते गणेश खणकर यांनी सभागृहात निषेधाचा ठराव मांडला आणि दिवसभर याविषयावर चर्चा सुरू होती.
विधानसभा, लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबरोबरच लोकसभा मतदारसंघाची फेररचना करण्यासाठीच्या विधेयकाला लोकसभेत शुक्रवारी इंडिया आघाडीने एकजुटीने विरोध केला. त्यामुळे हे विधेयक बहुमताअभावी फेटाळले गेले. ही घटनादुरुस्ती प्रतिष्ठेची करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारवर पराभवाची नामुष्की ओढावली.
मुंबई महापालिकेच्या सभागृहातही या पराभवाचे पडसाद उमटले. सभागृहात सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. मात्र सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभागृह नेते गणेश खणकर यांनी निषेधाचा ठराव मांडला. या देशात सामाजिक दृष्ट्या समतेचे नवे पर्व सुरू करण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती. मात्र विरोधकांच्या भूमिकेमुळे हे विधेयक फेटाळले गेले असे म्हणत खणकर यांनी निषेध केला. त्याला समर्थन देताना दिवसभर सत्ताधारी आणि विरोधकांची दोन्ही बाजूने भाषणे झाली.
मग महिलांना विकासनिधी पण द्या …
यावेळी भाषण करताना काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी म्हणाले की, महिलांचा इतकाच सन्मान करायचा असेल तर विरोधी पक्षातील महिला नगरसेविकांना विकासनिधी तोकडा का दिली. त्यांच्या विकासनिधीच्या
बाबतीतही विचार करा असा टोला आजमी यांनी लगावला. तसेच आतापर्यंत कोणत्याही पक्षाने महिलेला सर्वोच्च पदावर स्थान दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये, असाही इशारा आजमी यांनी दिला.
मुंबई महापालिकेत महिला राज
या चर्चेचा समारोप करताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, महायुतीच्या काळात मुंबई महापालिकेत महिला राज आहे. महापौर, आयुक्त, महापालिका चिटणीस, विरोधी पक्षनेत्या, वैधानिक समित्यांच्या अध्यक्षा या सर्व पदावर सध्या महिला आहेत.
त्यामुळे महिला आरक्षण हे फक्त बोलण्यापुरतेच नाही तर प्रत्यक्षातही आलेले आहे.
दांभिकपणा दाखवणाऱ्या विरोधकांची भूमिका इतिहास माफ करणार नाही. आज विधेयक रोखले तरी उद्या जनता तुम्हाला रोखेल असाही इशारा देत महापौरांनी निषेधाचा ठराव संमत केला.
महापौरांची काळी साडी ….
खास निषेधाच्या या ठरावासाठी भाजपचे सगळे नगरसेवक काळ्या रंगाचे कपडे घालून महापालिका मुख्यालयात आले होते. तर महापौर रितू तावडे यांनीही काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. महापौरांच्या खुर्चीने कधी काळा रंग पाहिला नाही तुम्ही तो दाखवला अशी टीका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांना काळे कपडे न घालता केवळ काळ्या फिती लावल्या होत्या. तर उपमहापौर संजय घाडी यांनीही काळे कपडे घातले नव्हते.
