मुंबई: मागील काही वर्षांपासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, ईव्हीएममधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा असून काँग्रेसच्या तक्रारीनुसार ईव्हीएम पडताळणी न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीत २०२४ साली चांदवली मतदारसंघात ईव्हीएममध्ये घोटळा झाल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन तपासणीचे आदेश दिले आहेत. दिनांक १६ व १७ एप्रिलला यातील काही मशीनची तपासणी बोरीवली येथे सुरू झाली असून यासंदर्भात माहिती देताना नसीम खान यांनी न्यायालयाने डेटा सहित तपासणी करण्याचा आदेश दिला होता, तो पाळण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ फासणारी आहे. सीयू, बीयू, व्हीव्हीपॅट फक्त जोडणी करून दाखवली. त्याला आमचा विरोध आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला पत्र देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा नसीम खान यांनी दिला.
लोकशाहीमध्ये निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडल्या पाहिजेत व त्याची सर्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगाचा गैरकारभार, घोटाळे यांचा पर्दाफाश केलेला आहे, पण आयोग मात्र विरोधांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. हा फक्त चांदिवली विधानसभा निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर हा लोकशाही आणि निवडणुकांची निष्पक्षता व पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असेही नसीम खान म्हणाले.
