मुंबई : चेन्नई-नाशिक द्रुतगती महामार्गातील ३७४ किमीच्या नाशिक-अक्कलकोट, सोलापूर महामार्गाच्या बांधकामासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) दोन टप्प्यांत निविदा मागविल्या होत्या. मात्र, त्याला प्रतिसादच न मिळाल्याने आधीची निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याची वेळ एनएचएआयवर आली आहे. त्यानुसार आता नव्याने निविदा मागविण्यात आल्या असून निविदा प्रक्रिया लांबल्याने साहजिकच आता प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यासह काहिसा विलंब होणार आहे.

सुरत ते चेन्नई असा १२७१ किमीचा द्रुतगती महामार्ग प्रकल्प एनएचएआयने हाती घेतला होता. मात्र, पुढे सहा मार्गिकांच्या या महामार्गाच्या संरेखनात एनएचएआयने मोठा बदल केला आहे. या बदलानुसार आता हा महामार्ग चेन्नई ते नाशिक असा असणार असून या महामार्गाची एकूण लांबी ९०० किमी अशी असणार आहे. हा महामार्ग नाशिकला थेट चेन्नईशी जोडणार असल्याने हा महामार्ग महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच. पण त्याचवेळी नाशिक ते अक्कलकोटदरम्यानचा प्रवासही अतिजलद होणार असल्याने या प्रकल्पाचे महत्त्व आणखी वाढत आहे. नाशिक ते चेन्नई महामार्गाच्या ९०० किमीपैकी ३७४ किमीचा भाग महाराष्ट्रातून जाणार असून नाशिक ते अक्कलकोट असा हा भाग आहे. महाराष्ट्रातील या ३७४ किमीच्या महामार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या दृष्टीने एनएचएआयने फेब्रुवारीमध्ये बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट द्रुतगती महामार्ग अशा दोन टप्प्यांत या निविदा मागविण्यात आल्या होत्या.

अंदाजे १९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

एप्रिलअखेरीस निविदा अंतिम करून कंत्राट बहाल करून पुढील कार्यवाहीस सुरुवात करण्याचे नियोजन एनएचएआयचे होते. मात्र, या निविदेस शून्य प्रतिसाद मिळाल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करावी लागल्याची माहिती एनएचएआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली. तर आता अंदाजे १९ हजार कोटी रुपयांच्या नाशिक ते अक्कलकोट महामार्गासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या निविदेनुसार आता ९ जुलैला निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. तेव्हा यावेळी तरी या निविदेला प्रतिसाद मिळतो का आणि हा महामार्ग मार्गी लागतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेस विलंब झाल्याने प्रकल्पाची अंमलबजावणीही लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे.

नाशिक ते अक्कलकोट अवघ्या चार तासांत

नाशिक ते अक्कलकोट महामार्ग ३७४ किमीचा आणि अंदाजे १९ हजार कोटी रुपयांचा आहे. दोन टप्प्यांत या महामार्गाचे काम केले जाणार आहे. नाशिक ते अहिल्यानगर असा पहिला टप्पा तर अहिल्यानगर ते अक्कलकोट असा दुसरा टप्पा असणार आहे. या प्रकल्पाच्या कामास पुढील वर्षी सुरुवात करून काम पुढील तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन एनएचएआयचे आहे. त्यामुळे २०२९-३०मध्ये हा महामार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नाशिक ते अक्कलकोट असे ४५० किमीचे अंतर थेट ३७४ किमीवर येणार आहे. हा सहा पदरी शीघ्रगती प्रवेश नियंत्रण महामार्ग असल्याने ३७४ किमीचे अंतर केवळ चार तासांत पार करता येणार आहे.