एनएचआयकडून दोन टप्प्यांमध्ये निविदा प्रसिद्ध

मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) चेन्नई – नाशिक द्रुतगती महामार्गातील नाशिक – अक्कलकोट टप्प्याच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नाशिक – अहिल्यानगर आणि अहिल्यानगर – अक्कलकोट अशा दोन टप्प्यात ३७४ किमीच्या नाशिक – अक्कलकोट द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

दोन टप्प्यासाठी स्वतंत्र दोन निविदा मागविण्यात आल्या असून एप्रिलमध्ये निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. निविदा अंतिम करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून या महामार्गाच्या कामास शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. हा महामार्ग पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नाशिक – अक्कलकोट प्रवास १० तासांऐवजी केवळ चार तासात करता येणार आहे.

एनएचआयने १२७१ किमीचा सुरत – चेन्नई द्रुतगती महामार्ग प्रकल्प हाती घेतला. सहा मार्गिकांच्या या महामार्गात बदल करण्यात आला असून हा महामार्ग आता चेन्नई – नाशिकदरम्यान असणार आहे. त्यामुळे या महामार्गाची लांबी आता नाशिक – चेन्नई अशी ९०० किमी असणार आहे. या ९०० किमीच्या महामार्गातील महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा नाशिक – सोलापूर – अक्कलकोट हा आहे.

हा टप्पा नाशिक आणि सोलापूरला जोडून या दोन जिल्ह्यांतील प्रवासाचे अंतर कमी करणार आहे. आजघडीला नाशिक – अक्कलकोट प्रवासासाठी १० तासांचा अवधी लागतो. मात्र ३७४ किमीचा नाशिक-अक्क्लकोट महामार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर १० तासांचा प्रवास केवळ चार तासांवर येणार आहे. त्यामुळे नाशिककर आणि सोलापूरकरांच्यादृष्टीने हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या महामार्गाला नुकतीच केंद्र सरकारने मान्यता दिली. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर एनएचएआयने प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने पहिले आणि महत्त्वाचे पाऊल उचलले. एनएचआयने या महामार्गाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती एनएचएआयचे प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

अंदाजे १९ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गासाठी दोन टप्प्यात निविदा मागविण्यात आल्या आहेत.नाशिक – अहिल्यानगर आणि अहिल्यानगर – अक्कलकोट असे हे दोन टप्पे आहेत. मार्चअखेरीस निविदा खुल्या होण्याची आणि त्यानंतर एप्रिलमध्ये निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. तर निविदा अंतिम करून, भूसंपादन पूर्ण करून या महामार्गाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. तर कामाला सुरुवात झाल्यापासून तीन ते साडेतीन वर्षात काम पूर्ण करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. त्यामुळे हा महामार्ग २०२९-२०३० मध्ये सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. नाशिक – अक्कलकोट दरम्यानचे अंतर आजघडीला ४५० किमी आहे. नवीन महामार्गामुळे हे अंतर ३७४ किमीवर येणार आहे. तर हा सहा पदरी शीघ्रगती प्रवेश नियंत्रण महामार्ग असल्याने ३७४ किमीचे अंतर केवळ चार तासात पार करता येणार आहे.