मुंबईः नाशिक धर्मांतर प्रकरण फार धक्कादायक आणि गंभीर असून याच्या मुळाशी जाण्यासाठी आता केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ फडणवीस हे भाजप उमेदवारांच्या प्रचार्र्थ कोलकाता येथे सहभागी झाले होते. फडणवीस यांनी तेथील उद्योजकांशी संवाद साधला तसेच मराठी मतदारांशी संवाद साधताना रोड शो आणि प्राचार सभांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणावरही भाष्य केले. हे प्रकरण अंत्यत गंभीर असून ज्या कंपनीत हे घडले आहे त्या टाटा कंपनीनेही यात कठोर भूमिका घेतली आहे. या धर्मांतर प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका कंपनीने घेतली आहे. पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरु असून धर्मांतराची कार्यप्रणाली आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी आता केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये आता परिवर्तन अटळ आहे, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. बंगाल मधील ही लढाई आता केवळ भाजप आणि टीएमसी किंवा ममता बॅनर्जी यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही; तर या निवडणुकीचे स्वरूप आता एका बाजूला ममता बॅनर्जी आणि टीएमसी, आणि दुसऱ्या बाजूला बंगालची जनता यांच्यातील ही लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.एकेकाळी कोलकाता आणि पश्चिम बंगाल हे देशाची आर्थिक, व्यापारी आणि औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जात होते.
एकेकाळी बंगालकडे देशाच्या विकासाचे इंजिन आणि उत्पादन केंद्र म्हणून पाहिले जात असे. मात्र आधी माकप आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळात या राज्याची वाताहात झाली असून ममता बॅनर्जी यांचा कारभार पाहताना, कधीकधी या पेक्षा माकपची राजवट बरी होती असे वाटते. आज मुंबई आणि महाराष्ट्राची ओळख देशाची आर्थिक आणि व्यापारी राजधानी म्हणून होत असली, तरी ऐतिहासिकदृष्ट्या हा मान कोलकाता आणि बंगालकडे होता. म्हणूनच, ही निवडणूक केवळ एखाद्या विशिष्ट गटाच्या हाती सत्ता सोपवण्यापुरती मर्यादित नाही तर बंगालच्या भविष्याची आणि भवितव्याची ही निवडणूक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
