मुंबई : नाशिक येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त भाजीपाला उत्पादनासाठी नाशिकसह शेजारील जिल्ह्यांमध्ये हरितगृह, शेडनेट सारख्या संरक्षित शेतीला चालना देण्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या योजनेला केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे.

नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ या काळात पार पडणार आहे. सुमारे २८ महिने चालणाऱ्या या कुंभमेळ्यात सुमारे १२ कोटी लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. या लोकांसाठी अतिरिक्त भाजीपाल्याची गरज आहे. ही अतिरिक्त गरज भागविण्यासाठी नाशिकसह पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत हरितगृह, शेडनेट सारख्या संरक्षित शेतीद्वारे अतिरिक्त उत्पादन घेण्यात यावे, जेणेकरून भाजीपाल्याची गरज स्थानिक पातळीवर भागेल. संरक्षित शेतीची पायाभूत सुविधा उभी राहील. स्थानिक पातळीवर रोजगार वृद्धी होईल.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान न होता, दर्जेदार भाजीपाला ग्राहकांना मिळेल, या उद्देशाने कृषी विभागाने सुमारे ३०० कोटी रुपयांच्या संरक्षित शेती योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.

राज्य सरकारच्या या संरक्षित शेती योजनेच्या प्रस्तावाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्राथमिक मंजुरी दिली आहे. प्रस्तावातील काही त्रुटी दूर करून संबंधित प्रस्ताव नव्याने सादर करण्याच्या सूचनाही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सुधारित प्रस्ताव पाठिवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

संरक्षित शेतीची निकड

हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. उन्ह, वादळी वारा, पाऊस, अतिवृष्टी, गारपीट सारख्या आपत्तींमध्ये पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि खात्रीशीर उत्पादनांसाठी संरक्षित शेती गरजेची आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाजीपाल्याच्या मागणीत अचानक वाढ होणार आहे. संभाव्य मागणी, स्थानिक शेतकऱ्यांचे हित आणि शेतीच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने संरक्षित शेती योजनेला प्राथमिक मंजुरी दिली आहे, सुधारित प्रस्ताव लवकरच पाठविला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.