मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून नाशिकमधील खासगी विकासकाच्या प्रकल्पातील घरे सोडतीशिवाय परवडणाऱ्या दरात घेण्याची शेवटची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. म्हाडाकडून २० टक्के सर्वसमावेशक गृहयोजना काढून घेण्यात आली असून आता २० टक्क्यांतील घरांसाठी नाशिक मंडळाकडून सोडत काढली जाणार नाही. म्हाडाच्या नाशिक मंडळाने विक्रीविना रिक्त राहिलेली २० टक्के योजनेतील घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वाने विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३२४ घरांच्या ‘प्रथम प्राधान्य’अंतर्गत विक्रीसाठी मंगळवारपासून नोंदणी, अर्जभरणा प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, विहितगाव शिवार, सिन्नर फाटा, पाथर्डी शिवार, म्हसरूळ शिवार, आगर टाकळी शिवार, गंगापूर शिवार, देवळाली शिवार, चेहडी शिवार, मेरी-रासबिहारी लिंक रोड, आडगाव शिवार येथे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे दोनपेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही काही कारणाने रिक्त राहिली आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये २० टक्के योजनेत मोठा गैरव्यवहार झाला असून विकासकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडांचे बेकायदेशीररित्या तुकडे पाडून २० टक्के योजनाच लागू होऊ नये यासाठी प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू असून याप्रकरणी काही अधिकाऱ्यांना अटकही झाली. या प्रकरणानंतर राज्य सरकारने २० टक्के योजनेची अंमलबजावणी कठोर करण्याऐवजी म्हाडाकडून ही योजना काढून घेत पालिकांकडे वर्ग केली. त्यामुळे आता यापुढे २० टक्क्यांतील घरांचे वितरण पालिकेकडून केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त होत असून म्हाडाकडेच योजनेची अंमलबजावणी राहू द्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे आता म्हाडाच्या विभागीय मंडळांना २० टक्क्यांतील घरे १२ ऑगस्टपासून उपलब्ध होणे बंद झाले आहे. त्यामुळे १२ ऑगस्टपूर्वी जी काही घरे मंडळांना मिळाली असतील वा विक्रीवाचून रिक्त राहिली असतील, त्या घरांची विक्री मंडळांकडून केली जाणार आहे. त्यानुसार नाशिक मंडळाने २० टक्क्यांतील रिक्त ३२४ घरांची विक्री ‘प्रथम प्राधान्य’ तत्त्वाने सुरू केली आहे. त्यामुळे खासगी विकासकाच्या प्रकल्पातील घर सोडतीशिवाय परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची ही नाशिककरांसाठी शेवटची संधी आहे.

या घरांसाठी मंगळवारपासून नोंदणी, अर्जभरणा प्रक्रियेला सुरुवात झाली. तर आज, बुधवारी ११ वाजल्यापासून अनामत रक्कम भरून अर्ज सादर करता येणार आहे. एखाद्या घरासाठी जो अर्जदार सर्वात आधी अनामत रकमेसह अर्ज सादर करेल, त्याला ४८ तासांत घराची निश्चित अशी रक्कम भरावी लागेल. अन्यथा त्या जागी दुसऱ्या क्रमांकाच्या अर्जदारास संधी दिली जाईल. या घरविक्री योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना म्हाडाच्या https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी, अर्जभरणा करावा लागेल. तर https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन या घरविक्रीची सर्व माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.