मुंबई : नाशिकमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) नाशिक परिक्रमा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परिक्रमा मार्गाच्या कामासाठी एमएसआयडीसीने डिसेंबर २०२५ मध्ये सात टप्प्यांत निविदा मागविल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून नुकत्याच सातपैकी चार टप्प्यांतील निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत.

चार टप्प्यांसाठी आठ निविदा सादर झाल्या असून उर्वरित तीन टप्प्यांतील निविदा ९ फेब्रुवारीला खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर या निविदांची छाननी करून आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील आणि पुढे कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून परिक्रमा मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे.

नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी, शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नाशिक परिक्रमा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रकल्पासाठी आठ हजार कोटी रुपये निधी उभारण्याचे आव्हान पाहता हा प्रकल्प राज्य सरकारने एमएसआयडीसीकडे वर्ग केला.

निधी उभारणीसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) एमएसआयडीसीला निधी देण्याची तयारी दाखवल्याने हा प्रकल्प एमएसआयडीसीकडे देण्यात आला. या प्रकल्पाची जबाबदारी आल्यानंतर एमएसआयडीसीने पुढील प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर २०२५ मध्ये प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. तर आता नुकत्याच सातपैकी चार टप्प्यांतील निविदा खुल्या करण्यात आल्या असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार १३.८०० किमीच्या आणि ६६२ कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी व्हीएच खत्री कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्टसच्या निविदा आल्या आहेत. ७.६४० किमीच्या आणि ३४५ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या चौथ्या टप्प्यासाठी जीएचव्ही इंडिया प्रायव्हेट लमिटेड आणि व्हीएच खत्री कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निविदा सादर केल्या आहेत.

परिक्रमा मार्गाच्या सहाव्या टप्प्यासाठी एसआरएम कन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आणि श्रीजी इन्फ्रास्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निविदा सादर केली आहे. हा टप्पा १४ किमी लांबीचा आणि ५५८ कोटी ५८ लाख रुपये खर्चाचा आहे. शेवटच्या ४८४ कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या आणि १०.७३० किमी लांबीच्या सातव्या टप्प्यासाठी एएस देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हीएच खत्री कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या निविदा आल्या आहेत. टप्पा १, ३ आणि ५ साठीच्या निविदा ९ फेब्रुवारीला खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर या सर्व निविदांची छाननी करून आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार असून त्यानंतर निविदा अंतिम करून पात्र निविदाकारास कंत्राट बहाल केले जाणार आहे. तर भूसंपादनीची प्रक्रिया पूर्ण करून चालू वर्षातच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नाशिकमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार असून हा प्रकल्प नाशिकसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.