मुंबई : नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, तसेच वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ६६.१५ किमी लांबीचा नाशिक वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार या रस्त्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) सात टप्प्यांत निविदा मागविल्या होत्या. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला असून नुकत्याच आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वात कमी बोली लावणाऱ्या निविदा निश्चित करण्यात आल्या असून आता त्या अंतिम करण्यासाठी प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

निविदांना मान्यता मिळाल्यानंतर मार्चअखेरीस प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे. कामास सुरुवात झाल्यापासून १५ ते १६ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दीड वर्षांत हा रस्ता पूर्ण होऊन नाशिककरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल. तसेच कुंभमेळ्यात वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करता येईल, असा दावा करण्यात येत आहे.

नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासह कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी राज्य सरकारने नाशिक वर्तुळाकार रस्त्याची संकल्पना मांडली. प्रारंभी या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) सोपविण्यात आली होती. एमएसआरडीसीने सल्लागार ‘मोनार्च’ कंपनीमार्फत आराखडा तयार करून प्रक्रिया सुरू केली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी हा प्रकल्प एमएसआरडीसीऐवजी एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आला. प्रकल्प हाती आल्यानंतर एमएसआयडीसीने सात टप्प्यांत बांधकामासाठी निविदा मागविल्या.

काही दिवसांपूर्वी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या. त्यानुसार टप्पा १ साठी बी. आर. भदाणे बिल्डकॉन, टप्पा २ साठी व्हीएच खत्री कन्स्ट्रक्शन प्रा. लि., टप्पा ३ साठी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, टप्पा ४ साठी जीएचव्ही इंडिया प्रा. लि., टप्पा ५ साठी मोंटेकार्लो लिमिटेड, टप्पा ६ साठी एसआरएम कन्स्ट्रक्टर्स लि. आणि टप्पा ७ साठी ए.एस. देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या निविदा सर्वात कमी दराच्या ठरल्याची माहिती एमएसआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या निविदा अंतिम करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून लवकरच त्यास मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी निधी उभारणीसही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत ३६५९.४७ कोटी रुपये निधी उभारून प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. प्रकल्पासाठी सुमारे ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित भूसंपादनही लवकरच पूर्ण केले जाणार आहे. मार्चअखेरीस कामास सुरुवात करून १५ ते १६ महिन्यांत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दीड वर्षांत नाशिकमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा दावा एमएसआयडीसीकडून करण्यात आला आहे.