मुंबई : सन २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला १, ८०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. हा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी वापरला जाणार आहे.
राज्य सरकारने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पावसाळी अधिवेशनात ३ हजार कोटी रुपये पुरवणी मागणीद्वारे मंजूर केले आहेत. प्राधिकरणाच्या विनंतीनुसार १ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने आज मान्यता दिली. यापूर्वी सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्राधिकरणाला ३ हजार ९७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
यापूर्वी, कुंभमेळ्याशी संबंधित कामांसाठी विविध टप्प्यांवर २८३ कोटी, ७१७ कोटी, ५०१.४० कोटी, ३९६.६० कोटी आणि १,२०० कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. मंजूर निधीच्या वापरासाठी यात अटी घालण्यात आल्या आहेत त्यानुसार, ही रक्कम केवळ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या मंजूर उद्दिष्टांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांवरच खर्च केली जावी. वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि निकष, आर्थिक अधिकार प्रदान करण्याबाबतचे नियम तसेच इतर सूचना व अटींनुसारच या निधीचा वापर केला जावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात पोलिसांनी कुंभमेळ्यासाठीच्या बनावट कामांच्या आदेशांशी संबंधित ३०५ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता आणि अनेक जणांना अटक केली होती, त्यामुळे निधीसंदर्भात आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.
तांत्रिक मंजुरीनंतरच निधी वितरण
या नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संबंधित कामांना सक्षम प्राधिकरणांकडून प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित संस्थांना निधी वितरित केला जावा किंवा खर्च केला जावा, अशी अटही यात घालण्यात आली आहे.खर्च झाल्यानंतर, त्याचे विनियोग प्रमाणपत्र त्वरित सरकारला सादर करणे आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी संबंधित अर्थसंकल्पीय शीर्षकाखाली उपलब्ध असलेल्या तरतुदीतून हा खर्च भागवला जाईल, असे शासन नमूद करण्यात आले आहे.
