मधु कांबळे

मुंबई : काँग्रेस समितीच्या उदयपूर नवसंकल्प शिबिरातील ठरावानुसार, महाराष्ट्रात ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रदेश कार्याध्यक्ष असलेले माजी मंत्री नसिम खान यांनी मंगळवारी मुंबई काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष या दुसऱ्या पदाचा राजीनामा दिला. आता दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदे धारण करणाऱ्या तसेच, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदांवर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे पद जाण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसच्या उदयपूर शिबिरात ब्लॉकस्तरापासून ते राष्ट्रीयस्तरापर्यत मोठय़ा प्रमाणावर संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन कार्यकत्यांना संधी मिळण्यासाठी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर राहिलेल्या कार्यकर्त्यांना पदावरून दूर करणे आणि एक व्यक्ती एक पद या धोरणाची अंमलबजावणी करणे, पक्ष संघटनेत किमान ५० टक्के पदांवर ५० पेक्षा कमी वय असलेल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे, या सूचना विचारात घेऊन संघटनात्मक फेरबदल करण्यास सांगण्यात आले आहे.

 मुंबईत  दोन दिवस राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची व मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत उदयपूर घोषणापत्राप्रमाणे राज्यात एक व्यक्ती, एक पद या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.  आमदार वजाहत मिर्झा यांची प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्याकडील यवतमाळ जिल्हा  अध्यक्षपद काढून घेण्यात आले. त्यानंतर यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. प्रफुल्ल खुशालराव मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक पदे धारण करणारे काही प्रमुख पदाधिकारी

माजी राज्यमंत्री रमेश बागवे ( प्रदेश उपाध्यक्ष व पुणे जिल्हा अध्यक्ष) , शरद अहेर ( प्रदेश उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा अध्यक्ष) , सचिन नाईक (अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव व प्रदेश उपाध्यक्ष) , रवींद्र दळवी (अखिल भारतीय काँग्रेस समिती समन्वयक व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस) , सिद्धार्थ हत्तीअंभिरे (प्रदेश सरचिटणीस व प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष) , उमाकांत अग्निहोत्री ( प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व उत्तर भारतीय विभागाचे पदाधिकारी) , अमरजितसिंह मनहास, कोषाध्यक्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष , देवानंद पवार ( प्रदेश सरचिटणीस व प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष)  आदी नेत्यांचा समावेश आहे.

  • पक्षसंघटनेत पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये  हुसेन दलवाई सुभाष कानडे, डॉ. शोभा बच्छाव, हरिभाऊ शेळके, हुस्नबानू खलिपे, राजेश शर्मा, तारिक युनूस फारुकी, श्याम उमालकर, विनायक देशमुख, अभिजीत सकपाळ, राजन भोसले, सचिन सावंत, अभय छाजेड, शैलेश चाकोरकर यांचा समावेश आहे.