मुंबई: पुणे जिल्हयाच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने रविवारी केली. गेल्या दोन वर्षात राज्यातील विविध घटनांच्या एसआयटी तपासाची गती पाहता गंभीर आणि राजकीयदृष्टया तापलेल्या प्रकरणांवर राज्य सरकार एसआयटीची फुंकर मारत वेळ काढत असल्याचे दिसून येते.
राज्यात विविध गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी वेळोवेळी विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहेत. यातील काही महिलांवरील अत्याचाराशी सबंधित तर काही राजकीय वाद, हत्याप्रकरणाशी सबंधित एसआयटींचा समावेश आहे. नसरापूरप्रमाणेच सातारा येथील अल्ववयीन मुलीची हत्याप्रकरण, फलटनमधील महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरण, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांने महिलांचे केलेले शोषण, नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि महिलांचे शोषण अशा काही गाजलेल्या आणि समाजात संतापाचा उद्रेक झालेल्या घटनांचा विविध एसआयटींच्या माध्यमातून तपास सुरु आहे.
नसरापूर येथील बालिका हत्याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. अशाचप्रकारे राज्यात गेल्या काही महिन्यात घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणांच्या चौकशीसाठी विविध एसआयटींची स्थापन करण्यात आली आहेत. अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यातील सासपडे येथे एका शालेय विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी ऑक्टोबर २५ मध्ये एसआयटीची घोषणा करण्यात आली होती. याच दरम्यान सातारा जिल्ह्यातील फलटन येथे महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणात सरकारशी सबंधित काही राजकीय नेतेमंडळींवर आरोप झाल्यानंतर सखोल तपासासाठी एसआयटीची घोषणा करण्यात आली. मात्र या दोन्ही प्रकरणात एसआयटीकडून केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यात एसआयटींचा सुळसुळाट झाला असून भोंदूबाबा अशोक खरात, टीसीएस महिला अत्याचार, त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार, धर्मांतर आणि म्हाडा घरांचा घोटाळा अशा विविध सहा प्रकरणांमध्ये एकाच वेळी सहा एसआयटी पथक काम करत आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन डझनहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांची एसआयटी तपास करीत आहे. तर टीसीएस कंपनीचील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण आणि धर्मांतर प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे.
राज्यात गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळा, वन जमीन हस्तांतरण प्रकरण,मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळ्यांची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहेत.त्याचप्रमाणे मराठा क्रांतीच्या आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे-पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमागील ‘मास्टरमाइंड’ कोण आहे आणि या आंदोलनाला राजकीय फूस किंवा आर्थिक पाठबळ होते का याचा शोध घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या एसआयटीचा तपासही अजून संपलेला नाही.
राज्यात गाजलेल्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने काही आरोपांनी अटक केली असली तर अजूनही या प्रकरणातील काही आरोपी एसआयटीला सापडलेले नाहीत. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठीही सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. विविध प्रकरणात गेल्या दोन दोन तीन वर्षात सरकारने अनेक प्रकरणांच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्या असल्या तरी एकाही प्रकरणाचा तपास एसआयटीने पूर्ण केल्याचे आणि आरोपींना शासन झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एसआयटी पथकांच्या कामगिरीबाबत सरकारने एकादी श्वेतपत्रिकाच काढावी अशी माहिती विरोधकांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.
