मुंबई: पुणे जिल्ह्यातील नसरापूर  येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून विरोधकांनी गृह विभागावर टीका केली आहे. या प्रकरणात आरोपीने याआधी गुन्हे केल्याचे माहीत असूनही पोलिसांनी ही माहिती न्यायालयात न दिल्याने या घटनेची चौकशी महिला आयपीएस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने सहा अधिकार्‍यांचे एक पथक तयार केले असून, त्यात दोन महिला अधिकार्‍यांचा समावेश आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (१ मे) उघडकीस आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री नसरापूरनजीक पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला, तसेच शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी संतप्त नागरिकांनी पुण्यातील नवले पुलाजवळ मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर तीव्र आंदोलन केले होते.

या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याविरुद्ध खून, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध आधीही विनयभंग आणि बालकावर अत्याचार प्रकरणात (पोक्सो) गुन्हा दाखल झाला होता.   या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथकाची स्थापना करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद असून त्यांच्या कार्यकाळात लहान मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. फडणवीस हे २४ तास राजकारणात अडकल्याने त्यांचा गृह विभागावर वचक राहिलेला नाही असा आरोप राऊत यांनी केला. पीडित कुटुंबीय आणि जनतेवर लाठीमार करणे इतकेच कर्तृत्व पोलिसांचे आहे काय, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका अतिशय असंवेदनशील आहे. त्यांच्यावर विश्वास  नसल्याने या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.  सरकारचा पोलिसांवर व पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिलेला नाही, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

ही कोणती विकृती राज्यात पोसतोय – अमित ठाकरे

ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय? असा संतप्त सवाल मनसे नेते अमित ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे केला.  केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्य्लाडकी बहीणह्ण योजना जाहीर करून बहिणी सुरक्षित होत नसतात; त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो, असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘राजकीय नेत्यांनी भेटू नये’

‘जोवर माझ्या मुलीला न्याय मिळत नाही आणि या प्रकरणातील नराधमाला फाशी होत नाही, तोवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सांत्वनासाठी आमची भेट घेण्यास येऊ नये, अशी माझी नम्र विनंती आहे,’ असे आवाहन करणारी चित्रफीत नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित बालिकेच्या वडिलांनी रविवारी प्रसारित केली.

‘आरोपीला फाशी व्हावी यासाठी प्रयत्न’

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेचे रविवारी राजकीय पडसाद उमटले. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि घृणास्पद असून, पीडित कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. या गुन्ह्याला केवळ फाशी हीच शिक्षा असून, या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. समाजातील अशी विकृती वेळीच ठेचणे आवश्यक आहे,’ असे मोहोळ यांनी म्हटले.

चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा शेवटपर्यंत सुरू राहील. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून, यासाठी वरिष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. गोर्‍हे यांनी स्पष्ट केले.

आरोपीस मृत्युदंडासाठी सरकारचा प्रयत्न -मुख्यमंत्री

नागपूर : नसरापूर घटनेतील आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. या प्रकरणात जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सांगितले.

लातूरमध्ये पित्याकडून अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणी संतापाची लाट असतानाच लातूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गतिमंद मुलीवर तिच्या पित्याने वारंवार अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने १७ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.