scorecardresearch

आज सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे समूहगान; राज्यात ‘स्वराज्य महोत्सवां’तर्गत उपक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

आज सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे समूहगान; राज्यात ‘स्वराज्य महोत्सवां’तर्गत उपक्रम
संग्रहित छायाचित्र

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमा’त सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सव’ सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. राज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असा आदेशही त्यांनी दिला.

 सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळय़ा माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. राज्यातील अंगणवाडय़ा, सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची विद्यापीठे, खाजगी- शासकीय सर्व शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थी, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हाव़े नागरिकांनी असतील त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून उभे राहून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, असेही सरकारने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.