मुंबई: प्रवासात प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रक्कमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) प्रवाशांच्या सेवेत आणले. हे कार्ड अन्य परिवहन सेवांमध्येही वापरण्याची सुविधा उपलब्ध असली तरीही मुंबईसह राज्यातील अन्य परिवहन सेवांमध्येही एकच सामायिक कार्ड सेवा अद्यापही नाही. त्यामुळे बेस्टच्या या कार्डला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

बेस्टचे ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड)१३ एप्रिल २०२२ ला प्रवाशांच्या सेवेत आले. यामधून तिकीटाचे पैसे देऊन बेस्टबरोबरच मेट्रो, रेल्वेतूनही प्रवास करु शकतो. देशभरात एकच सामायिक कार्डची’सुविधा ज्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवांमध्ये आहे, तेथे बेस्टच्या कार्डचाही वापर करता येणार आहे. परंतु मुंबईसह राज्यातील अन्य परिवहन सेवांमध्येही एकच सामायिक कार्ड सेवा नसल्याने बेस्टच्या या कार्डला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती; मुंबईतील स्थानकांसाठी फेरनिविदा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

हे कार्ड सेवेत आल्यानंतर एका आठवड्यात ५८ कार्डांची विक्री झाली होती. त्यानंतर तीन महिन्यात एकूण २५० हून अधिक कार्डची विक्री झाल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी दिली. येस बँक आणि नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांचे प्रमुख उत्पादन असलेल्या रु पे यांच्यासह भागिदारीमध्ये बेस्ट को ब्रॅंडेड एकच सामायिक कार्ड करण्यात आले आहे. एकच सामायिक कार्ड १०० रुपयांत बेस्टच्या मुंबईतील सर्व आगारांत उपलब्ध आहे. प्रवाशांना नवीन कार्ड मिळवण्यासाठी भ्रमणध्वनीची माहिती देताना त्यावर आलेला ओटीपी, त्याची पडताळणी, पॅन किंवा आधार क्रमांक दाखवावा लागतो. बेस्ट बसगाड्यांमध्ये वाहकाकडून कार्ड त्वरीत रिचार्जची सोय केली जाणार होती. परंतु ही सेवा अद्याप उपलब्ध करण्यात आलेली नाही. मात्र ऑनलाईन रिचार्ज सेवा सुरू करण्यात आल्याचे चंद्र म्हणाले.