मुंबई : काँग्रेस पक्षाच्या आग्रही मागणी नंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ६ जुलैला घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन संख्याबळ होत असल्यास ही निवडणूक घेतली जाईल.

विधानसभा अध्यक्षपद हे गेले चार महिने रिक्त आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यपालांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अध्यक्षपदाचे घटनात्मक पद तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याची सूचना के ली आहे.

विधानसभा अध्यक्षपद जास्त काळ रिक्त ठेवणे योग्य नाही व पावसाळी अधिवेशनातच निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे के ली होती. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांची ही भावना असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. काँग्रेसचा दबाव, राज्यपालांकडून झालेली विचारणा यातून दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अनिल परब आदी या वेळी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे आधी स्पष्ट व्हावे, अशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका होती. अधिवेशनात तिन्ही पक्षांचे किती आमदार उपस्थित राहतील याचा आढावा घेऊनच मग निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल.

 भाजपच्या विरोधात लढा

विधानसभाध्यक्ष निवडणूक घेण्यात महाविकास आघाडी सरकारला काहीही अडचण नाही. विरोधी पक्षांनी या निवडणुकीत उमेदवार उभा के ल्यास आघाडी सरकारच्या संख्याबळापेक्षा जास्त मते मिळवून आमचा उमेदवार निवडून येईल, असा दावा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला. तसेच आपणच आरोप करायचा, आपणच चौकशी करायची व आपणच निकाल द्यायचा असले बदनामीचे राजकारण भाजपने सुरू केले आहे, अशी प्रतिक्रिया मलिकयांनी अजित पवार व अनिल परब यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत केली.

संग्राम थोपटे यांच्याकडे अध्यक्षपद?

पुणे जिल्ह्यातील भोरचे तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार संग्राम थोपटे यांचे नाव अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने महत्त्वाच्या पदावर कोणाला संधी दिलेली नाही. याशिवाय पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या कोणाकडेही पद नाही. या साऱ्यांचा विचार करून थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के . पाटील हे शनिवारी मुंबईत येत असून, आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दिल्लीतून काँग्रेसचे नाव निश्चित के ले जाईल.