मुंबई : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे गाळप हंगाम २०२४-२५ आणि २०२५-२६ साठी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षमता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. दोन्ही वर्षांतील एकूण ५७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले असून, राज्याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे.
नवी दिल्लीत २२ सप्टेंबरला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध राज्यांतील संबंधित मंत्री, साखर कारखान्यांचे संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ ही देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असून, तिच्या अंतर्गत सुमारे २६० सहकारी साखर कारखाने आणि नऊ राज्यस्तरीय साखर संघांचा समावेश आहे. सहकारी साखर उद्योगातील गुणवत्ता, कार्यक्षमता, आधुनिक तंत्रज्ञान, ऊस विकास, आर्थिक व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देण्यासाठी महासंघातर्फे दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात.
आठ प्रमुख पुरस्कारांच्या श्रेणी
राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम ऊस विकास, तांत्रिक कार्यक्षमता, आर्थिक व्यवस्थापन, उत्कृष्ट आसवणी प्रकल्प, सर्वोच्च साखर उतारा, संस्थात्मक सामाजिक दायित्व, सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना तसेच राष्ट्रीय स्तरावरील वसंतदादा पाटील पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचा समावेश आहे.
२०२४-२५ मध्ये महाराष्ट्राच्या कारखान्यांची दमदार कामगिरी
गाळप हंगाम २०२४-२५ साठी ऊस विकास पुरस्काराच्या उच्च उतारा विभागात कोल्हापूर मधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, जालना याला द्वितीय, तर सह्याद्री सहकारी साखर कारखाना, सातारा याला तृतीय पुरस्कार मिळाला.
तांत्रिक कार्यक्षमतेच्या पुरस्कारात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, सातारा प्रथम, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सांगली द्वितीय, तर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, पुणे तृतीय ठरला.
आर्थिक व्यवस्थापनाच्या विभागात महाराष्ट्रातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, सोलापूर याला तृतीय पुरस्कार मिळाला. सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार भगवती सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर याला मिळाला. तसेच संस्थात्मक सामाजिक दायित्वासाठी अशोक सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर याची निवड झाली.
सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना म्हणून श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर याची निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील वसंतदादा पाटील पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे याला मिळाला, तर जीवनगौरव पुरस्कार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर यांना जाहीर करण्यात आला.
२०२५-२६ मध्येही महाराष्ट्राचा दबदबा
गाळप हंगाम २०२५-२६ मध्येही महाराष्ट्रातील कारखान्यांनी विविध विभागांत आपले वर्चस्व कायम ठेवले. तांत्रिक कार्यक्षमतेच्या उच्च उतारा विभागात निरा भीमा सहकारी साखर कारखाना, पुणे प्रथम, विलास सहकारी साखर कारखाना, तुळजापूर द्वितीय आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे तृतीय ठरला. सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा याला मिळाला. संस्थात्मक सामाजिक दायित्वाच्या विभागात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली याची निवड झाली. सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, सोलापूर याला मिळाला. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा वसंतदादा पाटील पुरस्कार २०२५-२६ यासाठी क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, सांगली याची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र २१ पुरस्कारांसह अव्वल
दोन्ही गाळप हंगामांतील एकूण ५७ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला २१ पुरस्कार मिळाले आहेत. उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांना प्रत्येकी आठ, पंजाब आणि तमिळनाडूला प्रत्येकी पाच, हरियाणाला तीन, कर्नाटक व छत्तीसगडला प्रत्येकी दोन, तर मध्य प्रदेश, ओडिशा आणि दिल्लीला प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय पातळीवर स्पष्ट आघाडी घेतली आहे.
