मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संरचनेत बदल करत पदव्युत्तर पदविका (पीजी डिप्लोमा) अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पदव्युत्तर पदविकाऐवजी पदव्युत्तर ब्रॉड स्पेशालिटी पदवी अभ्यासक्रम (एमडी/एमएस) सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे अखेरचे वर्ष आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०२७-२८ पासून या अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही प्रकारे प्रवेश देण्यात येणार नाहीत.

वैद्यकीय शिक्षणाचे मानकीकरण करणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता वाढविणे, आधुनिक शैक्षणिक निकषांशी पदव्युत्तर पात्रता सुसंगत करणे, तज्ज्ञ प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यमान संस्थात्मक क्षमतेचा अधिक प्रभावी वापर करणे या उद्देशाने देशातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम बंद करून त्याऐवजी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय एनएमसीने घेतला आहे.

देशातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकाच विषयात पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवी असे दोन्ही अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. काही महाविद्यालयांमध्ये केवळ पदविका अभ्यासक्रमच उपलब्ध आहेत. देशातील अनेक संस्थांकडे आवश्यक अध्यापकवर्ग, आवश्यक पायाभूत सुविधा, रुग्णसेवा सुविधा आणि इतर संसाधने उपलब्ध आहेत. याचा पुरेपुर वापर करून अधिक चांगल्या दर्जाची रुग्णसेवा पुरविणे आणि दर्जेदार डॉक्टर तयार करण्यासाठी या महाविद्यालयांमधील पदविका अभ्यासक्रमांचे पदवी अभ्यासक्रमांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय एनएमसीने घेतला आहे.

त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठीचे अंतिम वर्ष असणार आहे. त्यानंतर २०२७-२८ पासून कोणत्याही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची महाविद्यालयांना परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची जागा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम घेतील.

एनएमसीअंतर्गत असलेल्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने (पीजीएमईबी) सर्व वैद्यकीय महाविद्यालये, संस्था आणि विद्यापीठांना पदविका अभ्यासक्रमांच्या जागांचे एमडी किंवा एमएम अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये रुपांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जागांचे रुपांतर करण्यासाठी महाविद्यालयांनी वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाकडे (एमएआरबी) ऑनलाईन अर्ज करण्याचे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेसाठी एमएआरबीकडून स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करण्यात येणार आहे.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची पद्धत, निकष, आवश्यक कागदपत्रे आणि वेळापत्रकासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना एनएमसीकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व संबंधित वैद्यकीय महाविद्यालये, संस्था आणि विद्यापीठांना परिपत्रकातील निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश एनएमसीने दिले आहेत. तसेच रूपांतरण प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहितीची नोंद घेऊन दिलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी, असेही एनएमसीने स्पष्ट केले आहे.