मुंबई : राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपकडून दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला आहे. हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार, असा सवाल करीत भाजपचा डोळा आता मुंबईतील सत्तेवर असून मुंबईतील मराठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असून तो डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन’चा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. आचारविचार काहीही नसलेल्या भाजपला सत्तापिपासूप्रमाणे मुंबई मिळवण्याची हाव लागली आहे. मात्र, मराठी माणूस ती कदापि पूर्ण होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्रीदेखील कंत्राटी आहेत. त्या पदावर किती वेळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

मुंबईत १९६० च्या दशकात काँग्रेस नेते स. का. पाटील यांचा मोठा दरारा होता. त्यांच्याविरोधात कोण उभे राहणार, असा प्रश्न होता. पण, जॉर्ज फर्नाडिस यांनी स. का. पाटील यांचा मोठा पराभव केला. आम्हाला कोणी हरवू शकत नाही असे समजणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे. शेरास सव्वा शेर मिळतोच हे त्यांनी विसरू नये असे ठाकरे यांनी भाजपला सुनावले.