मुंबई : केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) दाखल केलेला गुन्हा खोटा, बनावट असून तो रद्द करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व  मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

विशेष न्यायालयाने खान यांची जामिनावर सुटका केली होती. त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना म्हटले होते. खान यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना न्यायवैद्यक अहवालाचा दाखला दिला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार आपल्याकडून सापडलेला प्रतिबंधित पदार्थ अमलीपदार्थ नव्हता. त्यामुळे अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा होऊ शकत नाही. म्हणून एनसीबीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, असे खान यांनी याचिकेत म्हटले आहे. 

न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या १८ पैकी केवळ एका नमुन्यात गांजा आढळून आला. तोही ७.५ ग्रॅम होता. त्यामुळे हस्तगत आलेले अमलीपदार्थ तस्करीसाठी होते हा एनसीबीचा दावा चुकीचा असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.