मुंबई : ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणे बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा या मागणीसाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲंड ड्रगिस्टने २० मे रोजी एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. यामुळे देशातील सर्व औषध विक्रेते आपले दुकान बंद ठेवणार आहेत. औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या या बंददरम्यान नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत व अखंडपणे उपलब्ध व्हावा यासाठी ‘एफडीए’ने आवश्यक उपाययोजना करीत सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.

देशातील औषध व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणावर आहे. लाखो कुटुंबांचा रोजगार या क्षेत्रावर अवलंबून आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे किरकोळ विक्रेत्यांना स्पर्धा करणे कठीण होत आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीचा गैरवापर, फार्मासिस्टशिवाय औषधविक्रीमुळे सार्वजनिक आरोग्याशी संबंधित वाढते धोके यामुळे औषधविक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असावी यासाठी केंद्र सरकारने कायदे करावेत या मागणीसाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स, तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन यांनी बंदची हाक दिली आहे.

ग्राहकांना जीवानावश्यक औषधाचा पुरवठा अव्याहत सुरू राहावा, सामाजिक बांधिलकी व रुग्ण सेवा विचारात घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन ‘एफडीए’ने औषध विक्रेता संघटनेस संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याला संघटनेकडून सकात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बंदच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना औषधे सुरळीत मिळावीत यासाठी ‘एफडीए’चे सह आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी यांच्या निर्देशानुसार मुंबईतील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने, तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी ‘एफडीए’कडून समन्वय साधण्यात येत आहे. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले आहेत.

तसेच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, मुंबई महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, भारतीय वैद्यक संघटना, खाजगी व निमसरकारी रुग्णालये यांच्याशी संपर्क साधून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबई विभागात प्रत्येक विभागनिहाय आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नये

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद््भवल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये सपंर्क साधावा, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

औषधांसाठी विभागनिहाय संपर्क क्रमांक

कुलाबा ते भायखळा – ९४२३६१०३२५

महालक्ष्मी ते वांद्रे, वडाळा शिवडी – ८१६९३९३६८१

कुर्ला पूर्व ते घाटकोपर, शिवाजी नगर – ८००७८७७७५४

विक्रोळी ते मुलुंड, कुर्ला पश्चिम – ९४०४१७३५८१

खार, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी – ८१०८१२९००१

जोगेश्वरी ते मालाड – ९६१९२०७९७६

कांदिवली ते दहिसर – ९३२३९५१४९६