मुंबई : नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचा कोणताही विस्तार केलेला नाही. केवळ प्रशासकीय सोयीसाठी हा प्रकल्प एकात्मिक नियंत्रणाखाली आणला आहे. बफर झोनमधील गावांचे पुनर्वसन करण्याचा सरकारचा विचार आहे. बफर झोनमध्ये शेती करण्यावर कोणतेही बंधन नाही. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाभोवती ५०० फूट रुंदीची बांबूची भिंत उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली.

परिणय फुके यांनी नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या सीमावाढीमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असल्याकडे लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी ७ सप्टेंबर २०१६ च्या अधिसूचनेचा दाखला दिला. गोंदिया आणि भंडारा येथील वन्यजीव विभागांचे नियंत्रण एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले होते. त्यानुसार हा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या दैनंदिन कामात किंवा शेती करण्यास कोणतेही अडथळे येणार नाहीत. फक्त नव्याने बांधकाम करता येणार नाही, असे नाईक म्हणाले.

सागवानची १२ हजार कोटींची  संपत्ती

वन विकास महामंडळाने लागवड केलेली सागवानाची सुमारे १२ हजार कोटी रुपये किंमती झाडे तोडणीला आली आहेत. ती तोडणी करून किंवा या संपत्तीवर बँकांकडून ६ हजार कोटींचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे. या निधीतून वन कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता आणि ‘सुगंधी रस्ते’ व ‘सप्तरंगी डोंगर’ या सारख्या विविध संकल्पना राबवल्या जातील, असे नाईक यांनी नमूद केले.

वन्यप्राणी हालचालींवर डिजिटल नियंत्रण

वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित कॅमेरे, सेन्सर्स आणि सॅटेलाईट प्रणालीच्या सहाय्याने संवेदनशील भागांमध्ये सतत निरीक्षण केले जात आहे. हिंस्र प्राणी जंगलाच्या बाहेर येऊ नयेत यासाठी अभयारण्यात त्यांच्या शिकार प्रजाती वाढविणे, फळझाडांची लागवड केली जाईल. पुढील दोन – तीन वर्षांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. पर्यटनाला चालना देण्यासाठी व्याघ्र सफारी तसेच विविध भागांत बिबट सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित विभागांना जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही नाईक म्हणाले.