मुंबई : नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या आणि आगमन होणाऱ्या विमानांची संख्या वाढत असली तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आहे. नवी मुंबई विमानतळावरून अंधेरीला जाण्यासाठी एका प्रवाशाला उबर टॅक्सीसाठी तीन हजार रुपये मोजावे लागले. विमान तिकिटांपेक्षाही नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करणे अधिक महाग असल्याने प्रवाशांकडून जादा बस आणि मीटर टॅक्सीची मागणी करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळ प्रवासी सेवेत रूजू झाले. नवी मुंबई विमानतळावरील विमानांची आणि प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आणि वाढता खर्च पाहता नवी मुंबई विमानतळाला बंगळुरूच्या विमानतळासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी भिती प्रवासी व्यक्त करीत आहेत.
रतन शारदा नावाच्या प्रवाशाने आपल्या एक्स अकाउंटवर वाढत्या प्रवास खर्चाबाबत चिंता व्यक्त केली आहे. नवी मुंबई विमानतळ – अंधेरीकरिता उबरने तीन हजार रुपये मोजावे लागले, . नवी मुंबई विमानतळाची बंगळूरू विमानतळाप्रमाणे अवस्था होईल. तिथे विमानापेक्षा प्रवास अधिक खर्चिक आणि वेळखाऊ आहे, असे रतन शारदा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर अशाच प्रकारची चिंता व्यक्त केली आहे.
एका प्रवाशाने सामानासाठी एक तासाहून अधिक वेळ आणि कॅबसाठी अतिरिक्त ३० मिनिटे थांबावे लागल्याचे म्हटले आहे. काही प्रवाशांनी वाहतूक सेवांच्या त्रुटींवर प्रकाश टाकत, संपूर्ण मुंबईतून नवी मुंबई विमानतळापर्यंत नियमित अंतराने एसी बस चालविण्याची मागणी केली आहे. एका प्रवाशाने कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव हे टॅक्सी महाग असण्यामागील मुख्य कारणांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. नवी मुंबई विमानतळ
पश्चिम उपनगरातील प्रवाशांकरिता सोयीस्कर नाही. कॅबचे दर जास्त आहेत. तसेच, मोबाइल नेटवर्कची समस्या असल्याचे दुसऱ्या एका प्रवाशाने म्हटले आहे.
