मुंबई: नवी मुंबई विमानतळ उभारणाऱ्या सिडको महामंडळ ज्यांच्या अधिपत्याखाली येते त्या उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विमानतळावरील अर्ध पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी निमंत्रित न केल्याने शिवसेना शिंदे पक्ष आक्रमक झाला आहे. ही टाळाटाळ राजकीय होती की प्रशासकीय याचा मंत्रिमंडळात जाब विचारला जाईल, असे शिंदे सेनेचे सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. विरोधक विनाकारण राजकारण करीत आहेत, असे स्पष्टीकरण खुद्द शिंदे यांनी दिले, तर मुख्यमंत्री म्हणजे सर्व मंत्रिमंडळ अशी सारवासारव उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन झाले. डिसेंबर पासून या विमानतळावरील विमान वाहतूक सुरु झाली. त्यावेळी या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज्यांचा अर्ध पुतळा त्वरीत उभारण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार पाच महिन्यात या विमानतळावर आर्कषक असा अर्धपुतळा उभारण्यात आला. या अर्धपुतळ्याचे शनिवारी शिवराज्याभिषक दिनाच्या निमित्ताने अनावरण झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री गणेश नाईक,महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे हे मंत्री उपस्थित होते. हा विमानतळ सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे.
विमानतळ प्रकल्पात सिडको भागिदार आहे. शिंदे नगरविकास मंत्री म्हणून सिडको महामंडळाचे प्रमुख आहेत. अदाणी उद्योग समुहाच्या वतीने या विमानतळाचे संचालन केले जाते. त्यामुळे शिंदे यांच्या अनुमती शिवाय हा कार्यक्रम होता कामा नये. त्यांना कार्यक्रमाला निमंत्रित करणे हे सिडकोचे कर्तव्य आहे, असा युक्तीवाद शिंदे सेनेचे नेते करीत आहेत. त्यामुळे ही टाळाटाळ प्रशासकीय आहे की राजकीय अशी चर्चा सुरु झाली आहे. महायुती मध्ये विधानपरिषद जागा वाटपावरुन धुसफूस सुरु होती. शिंदे यांना सात जागा हव्या होत्या पण त्यांना चार देण्यात आल्या. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. फडणवीस शिंदे नाराजी नाटय गेली दीड वर्षे सुरु आहे. त्यात या निमंत्रण टाळण्याने भर पडली आहे. नाईक, तटकरे यांना बोलविता आणि शिंदे यांना टाळता. त्याचा राग शिंदे सेनेतील नेत्यांना जास्त आला आहे. या निमंत्रण टाळाटाळीने महायुतीत सर्वकाही अलबेल नाही हा संदेश गेल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांनी राजकारण करु नये. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निमंत्रण टाळण्याचा जाब विचारला जाईल, असे कॅबिनेट मंत्री शिरसाट यांनी सांगितले.
शिंदे हे सिडकोचे मंत्री आहेत. त्यांना निमंत्रण दिले पाहिजे होते. आपल्याकडे एक पाण्याची योजना आहे. पाणी आडवा आणि जिरवा. भाजपने शिंदे यांची सध्या जिरवायला घेतली आहे. अशी टिप्पणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आणि शिंदे सेनेत नाराजीची ठिणगी पडली.
