मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या पुर्नविकासामुळे काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई विमानतळाकडे वळविण्यात येणार असल्याने विमान कंपन्यांमध्ये नाराजी आहे. विमान कंपन्यांची नाराजी दूर करून त्यांना नवी मुंबईकडे वळवण्याचा प्रयत्न अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कॅश व्हाऊचर, लँडिंग शुल्कावर १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. टर्मिनल १ ची इमारत ६० वर्षे जुनी आहे. त्यामुळे या टर्मिनलचा टप्प्याटप्याने पुर्नविकास करण्याचा निर्णय़ अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने घेतला आहे.
त्यासाठी मुंबई विमानतळावरील २६५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे २५ ऑक्टोबरपासून नवी मुंबई विमानतळावरुन होणार आहेत. मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास अजूनही प्रवाशांसाठी सोयीचा नसल्याने या विमानतळावरील उड्डाणांना अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांची या विमानतळावर प्रवासी वाहतूक वळवण्याची मानसिक तयारी नाही. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीला धक्का लागू नये यासाठी विमानकंपन्या आग्रही आहेत. विमानकंपन्या आणि प्रवाशांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पर्याय स्वीकारण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडतर्फे उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नवी मुंबई विमानतळावर नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लँडिंग शुल्कावर १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यासोबतच यूजर डेव्हलपमेंट शुल्कातील फरक भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना व्हाऊचर देण्याचीही योजना आखण्यात येत आहे.
प्रतिक्रिया ६० वर्षे जुन्या इमारतीच्या सुरक्षेमुळे या टर्मिनलचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुनर्विकास करताना मुंबई विमानतळाची ९१ टक्के प्रवासी वाहतूक पूर्णपणे सुरळीत राहील. पहिल्या टप्प्यात टर्मिनल १ बी च्या फक्त उत्तर भागाचे पाडकाम होणार आहे. पाडकाम मुंबई विमानतळाच्या टी १ क्षमतेच्या सुमारे एक तृतीयांश आहे. नवी मुंबई विमानतळावरील विमानांचे स्थलांतर तात्पुरते असून, हा मुंबई विमानतळाच्या ट्रॅफिकचा कायमस्वरूपी बदल नाही. मुंबई विमानतळावरून दरवर्षी अंदाजे ५ कोटी ५० लाख प्रवासी वाहतूक होते. यातील ५० लाख ( ९टक्के) प्रवाशांवर परिणाम होणार असल्याचे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी सांगितले. फायदा काय टी १चा पुनर्विकास जानेवारी २०२७ पासून सुरू होईल.पुर्नविकासामुळे टर्मिनलची क्षमता सध्याच्या प्रति वर्ष १५ दशलक्ष प्रवासी वरून ३३ टक्यांनी वाढून २० दशलक्षांपर्यत पोहोचणार आहे.
